लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: अभियांत्रिकीसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांची नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया संपत आली, तरी औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाची नोंदणी सुरू करण्यात आली नव्हती. अखेर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) या अभ्यासक्रमाची नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २० जुलैपर्यंत अर्ज करता येणार असून, पहिली अंतिम गुणवत्ता यादी २८ जुलैला प्रसिद्ध होणार आहे.
आणखी वाचा-अकरावी ऑनलाइन प्रवेशाचा कटऑफ तिसऱ्या फेरीत घटणार का? तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आज
सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांची नोंदणी सुरू करण्यात आली. मात्र औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली नसल्याने विद्यार्थी प्रतीक्षेत होते. या अभ्यासक्रमाची नोंदणी सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्य सीईटी सेलने मंगळवारी सायंकाळी औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार २० जुलैपर्यंत प्रवेशासाठी नोंदणी, २१ जुलैपर्यंत अर्ज निश्चिती करावी लागेल. तात्पुरती गुणवत्ता यादी २३ जुलै रोजी, तर अंतिम गुणवत्ता यादी २८ जुलै रोजी जाहीर होणार आहे. २९ जुलैपासून पहिली प्रवेश फेरी, ६ ऑगस्टपासून दुसरी प्रवेश फेरी, १५ ऑगस्टपासून तिसरी प्रवेश फेरी सुरू होईल. प्रवेशासाठी अंतिम मुदत ३० ऑगस्ट असल्याचेही सीईटी सेलने स्पष्ट केले.