पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी २७ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २० जून ते २७ जुलै दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल.
हेही वाचा >> मुख्यमंत्र्यांच्या नावाचे बनावट व्हॉटसॲप खाते; राजकीय व्यक्तींसोबत नागरिकांना मेसेज पाठवल्याने खळबळ
राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधारू इच्छिणारे विद्यार्थी, तुरळक विषयक घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी आणि आयटीआयचे श्रेयांक हस्तांतरण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाईल. राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार २० जून ते २७ जुलै दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येईल, २८ आणि २९ जुलैला माध्यमिक शाळांना बँकेत चलनाद्वारे शुल्क भरता येईल, तर २० जुलैला माध्यमिक शाळांना विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांची यादी जमा करता येईल.
विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत भरावे. ऑनलाइन अर्जात मार्च-एप्रिल २०२२ परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांची त्या परीक्षेतील माहिती घेता येईल. ही परीक्षा पहिल्यांदाच देणाऱ्या आणि श्रेणी सुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै ऑगस्ट २०२२ आणि मार्च २०२३ या लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील.