शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात चांगली होण्याची चिन्हे असून, रिक्त असलेली संचालक दर्जाची पदे अखेरीस भरण्यात येणार आहेत. ‘‘या आठवडय़ामध्ये शिक्षण विभागामध्ये सर्व संचालक दिसतील आणि ते सर्व विभागातीलच असतील,’’ अशी घोषणा दर्डा यांनी रविवारी केली. त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संचालक दर्जाच्या पदांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव अमलात येणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
शालेय शिक्षण विभागामधील ९ पैकी ६ संचालक पदे रिक्त आहेत. सध्या माध्यमिक शिक्षण विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, बालभारती, परीक्षा परिषद, अल्पसंख्याक आणि निरंतर शिक्षण विभाग, बालचित्रवाणी या विभागांची संचालक पदे रिक्त आहेत. ही सर्व पदे पदोन्नतीच्या माध्यमातून या आठवडय़ामध्ये भरण्यात येतील, असे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी जाहीर केले. त्यामुळे शिक्षण विभागातील संचालक दर्जाची पदे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याचा प्रस्ताव अमलात येणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
शिक्षण अधिकाऱ्याचे एकही पद सोमवारनंतर राज्यात रिक्त राहणार नाही अशाही घोषणा दर्डा यांनी केली आहे. याशिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ७१ उमेदवारांची भरती करण्यात आली आहे. या उमेदवारांना सहा महिने क्षेत्रीय कामाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या बाबत दर्डा यांनी सांगितले, ‘‘गुणवत्ता असलेले उमेदवार निवडण्यात आले असले, तरीही त्यांना क्षेत्रीय कामाचा अनुभव मिळणे, कामातील अडचणींची जाण येणे आवश्यक आहे. त्यासाठी या उमेदवारांची नियुक्ती करण्यापूर्वी त्यांना क्षेत्रीय कामाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पहिल्यांदाच राज्य सरकारने अशा प्रकारचा उपक्रम हातात घेतला आहे.’’
याशिवाय अ आणि ब वर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून काही पदे पदोन्नतीच्या माध्यमातून, तर काही सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही दर्डा यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा