पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचालकांकडून होणाऱ्या गंभीर अपघातांंच्या पार्श्वभूमीवर महामंडळाकडून नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार आता वाहनचालक आणि वाहकांंची दर सहा महिन्यांंनी आरोग्यतपासणी आणि मानसिक चाचणी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, चालकांना वर्षातून दहा दिवसांंचे प्रशिक्षण सक्तीचे असणार आहे. आगामी वर्षात या नियमावलीची अंमलबजावणी केली जाणार असल्याने एसटी बसच्या अपघातांना आळा बसणार आहे.
एसटी बसच्या वाहक, चालकांकडून वारंवार होणारे अपघात, वादविवाद या पार्श्वभूमीवर महामंडळाने नवीन नियमावली तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून, आगामी वर्षात तिची अंंमलबजावणी होणार आहे. डाॅक्टर, मानसोपचार तज्ज्ञ, नेत्रचिकित्सक, वाहतूक पोलीस आणि महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून ती बनविण्यात आली आहे.
नाशिक येथील बसस्थानकात अपघात झाला. कुर्ला येथे बेस्ट बस अपघातात सात जणांच्या मृत्यूची घटना घडली. अनेक ठिकाणी वाहनचालकांविरोधात तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर ही नियमावली तयार करण्यात आली असून, त्यामध्ये वर्षातून दोनदा चालक आणि वाहकांची आरोग्य तपासणी, मानसिक चाचणी बंधनकारक केली आहे.
महामंडळाकडे अत्याधुनिक आणि जुन्या १६ हजारांपेक्षा जास्त बस आहेत. ३४ हजार चालक, तर ३८ हजार वाहक आहेत. पुणे विभागात दोन हजार ३०० चालक आणि एक हजार ८०० वाहक आहेत. सध्या २८० अत्याधुनिक बस दाखल झाल्या आहेत. अनेक चालक हे खासगी आहेत. त्यांनादेखील ही नियमावली बंधनकारक असल्याचे पुणे विभागीय नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांंची भरती करताना आरोग्य तपासणी आणि मानसिक चाचणी घेतली जाते. खासगी संस्थांकडून या चाचण्या होत असतात. मात्र, आता दर सहा महिन्यांनी या चाचण्या बंधनकारक करण्याचे नवीन नियमावलीत सुचविण्यात आले आहे, असे नेहूल यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – सांगलीतील खून प्रकरणात पसार आरोपी अटकेत, खेड शिवापूर भागात कारवाई
कामगार विभागाच्या निर्देशानुसार वाहक, चालकांचे कामाचे आठ तासांचे स्वरूप असले, तरी दैनंदिन वाहतूक करताना बसचालकाला वाहतूककोंडी, वाहन अचानक नादुरुस्त होणे आदी समस्यांना तोंड देत मार्गक्रमण करावे लागते. वाहकांनादेखील प्रवाशांना तोंड देताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वादविवाद, विलंब आणि वेळापत्रक कोलमडणे आदी प्रकारांमुळे वाहक, चालक यांचे काम जिकिरीचे बनले आहे. कामातील तणावामुळे वाहक, चालक यांच्या मानसिकतेवर, आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून वादविवाद, अपघात आदी प्रकार घडत आहेत.
वाहक, चालकांकडूनदेखील चुकीच्या पद्धतीने वाहन चालविल्याने अपघात, वादविवाद झाल्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे आता नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे, असे विभागीय अधिकारी सचिन शिंदे यांनी सांगितले.
बसचे अपघात रोखण्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये दर सहा महिन्यांंनी आरोग्य तपासणी आणि मानसिक चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आगामी वर्षापासून या नियमावलीची अंंमलबजावणी केली जाणार आहे. – प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, पुणे