महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य सेवा परीक्षेमध्ये या परीक्षेपासून प्रत्येक विषयामध्ये किमान ४५ किंवा ४० टक्के गुण मिळवण्याची अट आयोगाने मागे घेतली आहे. मात्र, मुलाखतीला पात्र ठरण्यासाठी एकूण ४५ टक्के गुण आवश्यक आहेत.
एमपीएससीच्या मुख्य परीक्षेतून मुलाखतीसाठी पात्र ठरण्यासाठी अमागास वर्गातील उमेदवारांसाठी प्रत्येक विषयासाठी किमान ४५ टक्के आणि मागास वर्गातील उमेदवारांसाठी ४० टक्के गुणांची अट ठेवली होती. मात्र, येत्या मुख्य परीक्षेसाठी ही अट आता लागू राहणार नाही. या परीक्षेपासून मुलाखातीसाठीच्या निकषांमध्ये आयोगाने बदल केला आहे. त्यानुसार मुलाखतींना पात्र ठरण्यासाठी अमागास वर्गासाठी प्रत्येक विषयासाठी किमान ३५ टक्के गुण आणि मागासवर्गासाठी किमान ३० टक्के गुणांची अट ठेवण्यात आली आहे. मात्र, तिन्ही विषयात मिळून अमागासवर्गातील उमेदवारांना किमान ४५ टक्के आणि मागासवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. एमपीएससीची मुख्य परीक्षा २६ ते २८ ऑक्टोबर या कालावधीमध्ये औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे या केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
एमपीएससीच्या गेल्यावर्षी झालेल्या परीक्षेमध्ये ठेवलेल्या किमान गुणांच्या अटीमुळे ४४० जागांसाठी फक्त ७८८ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. किमान गुणांच्या अटीमुळे एकूण गुण जास्त असूनही एखाद्या विषयामध्ये १ किंवा २ गुण कमी मिळाल्यामुळे अनेक उमेदवार मुलाखतींसाठी अपात्र ठरले होते. या पाश्र्वभूमीवर किमान गुणांच्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी उमेदवारांकडून सातत्याने केली जात होती. त्यामुळे आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा