पुणे : सहायक प्राध्यापक पदासाठी आणि संशोधन पाठ्यवृत्तीसाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेतील (नेट) गुण पीएच.डी. प्रवेशांसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२४-२५पासून करण्यात येणार असून, या निर्णयामुळे पीएच.डी. प्रवेशासाठी वेगवेगळ्या परीक्षा देण्यापासून उमेदवारांची सुटका झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले. नेट परीक्षा जून आणि डिसेंबर अशा दोन सत्रांत राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणामार्फत (एनटीए) घेतली जाते. या परीक्षेतील गुणांचा वापर कनिष्ठ संशोधन पाठ्यवृत्ती (जेआरएफ) आणि सहायक प्राध्यापक पद नियुक्तीसाठी केला जातो. बरीच विद्यापीठे पीएच.डी. प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतात. त्यामुळे उमेदवारांना पीएच.डी. प्रवेशासाठी वेगवेगळ्या विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. या अनुषंगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अंमलबजावणीचा भाग म्हणून युजीसीने तज्ज्ञ समिती नियुक्ती केली होती. या समितीने केलेल्या शिफारसीनुसार नेट परीक्षाच पीएच.डी. प्रवेशासाठीची परीक्षा म्हणून ग्राह्य धरण्याचा निर्णय १३ मार्च रोजी झालेल्या युजीसीच्या ५७८व्या बैठकीत घेण्यात आला.

हेही वाचा – मी उमेदवार आहे माझ्याशी भिडा; वडिलांवर कसली टीका करता ? प्रणिती शिंदेंचे राम सातपुतेंना आव्हान

नव्या निर्णयामुळे नेट परीक्षेतील गुण विद्यापीठांकडून पीएच.डी. प्रवेशासाठी ग्राह्य धरू शकतात. त्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. नेट परीक्षेचा निकाल उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांसह पर्सेंटाइलमध्ये जाहीर केला जाणार आहे. या गुणांच्या आधारे उमेदवारांच्या तीन श्रेणी केल्या जातील. नेट परीक्षेत सर्वाधिक गुण असलेले उमेदवारांचा समावेश श्रेणी एकमध्ये असेल. श्रेणी एकमधील उमेदवार कनिष्ठ संशोधन पाठ्यवृत्ती, सहायक प्राध्यापक पदासह पीएच.डी.साठी पात्र ठरतील. श्रेणी दोनमधील उमेदवार सहायक प्राध्यापक पदासह पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र ठरतील. तर श्रेणी तीनमधील उमेदवार पीएच.डी. पदासाठी पात्र ठरतील. श्रेणी एकमधील या उमेदवारांना पीएच.डी. प्रवेशासाठी मुलाखत द्यावी लागेल. श्रेणी दोन आणि श्रेणी तीनमधील उमेदवारांना पीएच.डी. प्रवेशासाठी परीक्षेतील ७० टक्के गुण आणि ३० टक्के मुलाखत असा गुणभार असेल. त्यानंतर दोन्हीतील गुणांच्या आधारे गुणवत्तेव प्रवेश होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा – महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा

हेही वाचा – मैत्रीपूर्ण की बंड : चार दिवसांत निर्णय – आमदार सावंत

‘नेट’चे गुण एक वर्षच वैध…

श्रेणी दोन आणि श्रेणी तीन उमेदवारांनी नेटमध्ये मिळवलेले गुण पीएच.डी. प्रवेशासाठी एक वर्ष वैध राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या एका वर्षाच्या मुदतीत पीएच.डी.ला प्रवेश न घेतल्यास पुन्हा नेट परीक्षेत पात्र व्हावे लागणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Release of candidates from different entrance exams now opportunity to get admission through single exam pune print news ccp 14 ssb