पुणे : मागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे.पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या धरणात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली असून सद्यस्थितीला खडकवासला धरण साखळी क्षेत्र ९२.५८ टक्के भरले आहे. तर २६.९९ टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. त्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणामधून ३५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आला आहे. यामुळे सिंहगड रोड परिसरातील नदी काठच्या भागातील सोसायटीमधील पाणी जाण्याच्या घटना घडल्या आहे.
त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील पूरपरिस्थितीचा आढावा दूरध्वनीद्वारे घेतला.खडकवासला धरणातील विसर्ग दिवसा वाढवून पाणीसाठा ६५ टक्क्यांवर आणावा, जेणेकरून रात्रीच्यावेळी पाऊस झाल्यास नदीपात्रात अधिक विसर्ग करावा लागणार नाही. महापालिकेने ध्वनिक्षेपक आणि समाज माध्यमाद्वारे नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना द्याव्यात, त्यांना वेळोवेळी पुरपरिस्थितीची माहिती द्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकता नगर परिसराला भेट
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी एकता नगर परिसराला भेट दिली. तेथील मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून त्याचा आढावाही अधिकाऱ्यांनी घेतला. अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान भारतीय लष्कराची एक तुकडी मदतकार्यासाठी दाखल झाली आहे. या तुकडीत १०५ जवान आहेत आणि आवश्यकता असल्यास आणखी एक तुकडी राखीव म्हणून तयार ठेवण्यात आली आहे.