पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून ग्रामीण भागातील शेतीसाठी पहिल्या उन्हाळी आवर्तनाला बुधवारपासून (१ मार्च) सुरुवात होणार आहे. नवीन मुठा उजवा कालव्यातून हे आवर्तन देण्यात येणार आहे. १ मार्चपासून पुढील ५५ दिवस सतत कालव्यातून पाणी दिले जाणार असून, तब्बल पाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांत मिळून एकूण सध्या १८.७४ टीएमसी, म्हणजेच ६४.२७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पहिल्या उन्हाळी आवर्तनाद्वारे पाच टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर उन्हाळ्यात धरणांमध्ये उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊन ग्रामीण भागासाठी दुसरे उन्हाळी आवर्तन देण्यात येणार आहे. पहिले उन्हाळी आवर्तन संपल्यानंतर उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता जेवढे पाणी शिल्लक असेल, त्यानुसार दुसऱ्या आवर्तनात किती पाणी सोडायचे हे ठरविले जाणार आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पांत गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.९३ टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. गेल्या वर्षी २८ फेब्रुवारीपर्यंत चारही धरणांत १७.८१ टीएमसी, म्हणजेच ६१.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात धरणांमधील पाण्याचे जास्त बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे. तसेच उन्हाळ्यात शहरांत आणि ग्रामीण भागात पाण्याची मागणी वाढते. त्यानुसार जलसंपदा विभागाकडून पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – निकालापूर्वीच अश्विनी जगताप यांचे आमदार म्हणून शहभर धडकले फ्लेक्स
रब्बी आवर्तनात ३.८१ टीएमसी पाणी सोडले
खडकवासला धरणातून रब्बी हंगामासाठी ग्रामीण भागातील शेतीसाठी २५ डिसेंबर ते ६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ३.८१ टीएमसी पाणी सोडण्यात आले. आता उन्हाळ्यात दोन टप्प्यांत शेतीसाठी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. त्याकरिता कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष असलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून तत्त्वत: मान्यता घेण्यात आली आहे. त्यानुसार १ मार्चपासून पहिले उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.