पुणे : पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) रुग्णसंख्या वाढत आहे. या रुग्णांवरील उपचार महागडे असल्याने त्यांच्यावर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना आणि महापालिकेच्या शहरी गरीब योजनेतून उपचार केले जातील. खासगी रुग्णालयांनी रुग्णांना उपचाराचे दर जास्त आकारू नयेत, यासाठी त्यांच्यावर नियंत्रण ठेवले जाईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जीबीएसच्या रुग्णांवरील उपचार महागडे आहेत. पुण्यातील या आजाराचे बहुतांश रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या उपचारांचा खर्च सुमारे ५ लाख रुपये आहे. राज्य सरकारच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून या आजारावरील उपचारासाठी २ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जात आहेत. याचबरोबर महापालिकेच्या शहरी गरीब योजनेतूनही २ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत होणार आहेत. मात्र, उपचाराचा खर्च जास्त असल्याने उरलेला खर्च कसा करावयाचा, असा प्रश्न रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसमोर उपस्थित झाला आहे.

या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले, की राज्य सरकारची जनआरोग्य योजना आणि महापालिकेच्या शहरी गरीब योजनेतून रुग्णांवर मोफत केले जात आहेत. खासगी रुग्णालयांनी रुग्णांची लूट करू नये. खासगी रुग्णालयातील जीबीएस रुग्णांवरील उपचाराच्या खर्चावर सरकारचे नियंत्रण असेल. त्यामुळे त्यांनी रुग्णांकडून जास्त पैसे घेऊ नयेत. रुग्णांकडून जास्त पैसे घेतल्यास खासगी रुग्णालयांवर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर सरकारकडून रुग्णांना इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शनचा मोफत पुरवठा केला जात आहे. जनआरोग्य योजनेत समाविष्ट खासगी रुग्णालयांत उपचार घेण्यावर रुग्णांनी भर द्यावा.

जीबीएस उपचारासाठी पावले

  • महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात रुग्णांवर मोफत उपचार
  • जनआरोग्य योजनेतून २ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार
  • महापालिकेच्या शहरी गरीब योजनेतून २ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार
  • सरकारीसह खासगी रुग्णालयातील रुग्णांना मोफत इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शन

प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे हा आजार होत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर द्यावा. याचबरोबर पिण्याचे स्वच्छ असावे याची काळजी घ्यावी. नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे. – प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relief for gbs patients government control over the cost of treatment in private hospitals pune print news stj 05 ssb