लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : रेल्वे प्रवासी ज्येष्ठाच्या पिशवीतून साडेअकरा लाख रुपयांचे दागिने चोरून पसार झालेल्या चोरट्याला लोहमार्ग पोलिसांनी गजाआड केले. चोरट्याकडून जप्त दहा लाख ९३ हजारांचे दागिने नुकतेच तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाला परत करण्यात आले.
सुमीतकुमार सतवरसिंह (वय ३०, रा. सुलतानपुरी, दिल्ली, मूळ रा. भवानी खेडा, हरयाणा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत शिरीष विठ्ठलराव शितोळे (वय ७३, रा. आनंदपूरा, देवास, मध्य प्रदेश) यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. १३ जानेवारी राेजी शितोळे इंदूर-पुणे रेल्वेगाडीतून प्रवास करत होते.
पुणे रेल्वे स्थानकावर शितोळे दाम्पत्य उतरल्यानंतर त्यांच्या पिशवीतून साडेअकरा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचे उघडकीस आले. दागिने चोरीला गेल्यानंतर शितोळे यांनी पुणे रेल्वे स्थानक लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पुणे रेल्वे स्थानकासह १५० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले.
घोरपडी रेल्वे यार्ड परिसरात चोरटा सुमीतकुमार थांबल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला पकडले. त्याच्याकडून १० लाख ८३ हजारांचे दागिने जप्त करण्यात आले. न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून शितोळे यांना नुकतेच दागिने परत करण्यात आले. लोहमार्ग पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय अधिकारी बिपीन हसबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, उपनिरीक्षक यशवंत साळुंके, कदम, दांगट, टेके, बिडकर, केंद्रे, वाघमारे यांनी ही कारवाई केली.