लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : राज्यात शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असताना आता पुन्हा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (टेट) घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार आहे.
राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांसाठीची भरती प्रक्रिया पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेतून सुमारे १८ हजार शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे. तर पहिल्या टप्प्यात रिक्त राहिलेल्या पदांचा समावेश आता दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत केला जाणार आहे. त्यानुसार पवित्र संकेतस्थळावर जाहिराती नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील भरती येत्या काही महिन्यांत पूर्ण करून नव्या शैक्षणिक वर्षांत शाळांमध्ये नवे शिक्षक उपलब्ध करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. दुसऱ्या टप्प्यात किती जागा उपलब्ध होणार याकडे राज्यभरातील पात्रताधारकांचे लक्ष लागले आहे.
पवित्र संकेतस्थळामार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीतील (टेट) पात्रता आवश्यक आहे. २०१७ च्या शासन निर्णयानुसार वर्षातून दोन वेळा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्याची तरतूद होती. तर २०१९ च्या शासन निर्णयानुसार आवश्यकतेनुसार चाचणी घेण्याची तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेकडून शिक्षण आयुक्तालयामार्फत अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षक होण्यासाठी पात्र ठरण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे.
परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश पालकर म्हणाले, शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे, अंतिम निकाल येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येईल. तसेच अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयामार्फत शासनाला सादर करण्यात आला आहे. शासनाची मान्यता मिळाल्यानंतर परीक्षेबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल.