लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महापालिकेकडील एक हजार मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. मात्र निवडणुकीचे कामकाज असल्याचे कारण पुढे करत महापालिकेचे कामकाज करण्यास या कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी मूळ जबाबदारी सांभाळून निवडणूक आयोगाचे कामकाज करावे, असे परिपत्रक अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी काढले आहे.
जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. त्यासाठी महापालिकेसह अन्य शासकीय यंत्रणातील कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यांना शहरातील सहा विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. यात महापालिकेचे सुमारे एक हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
आणखी वाचा-पुण्यात मेट्रो मार्गांचा तिढा! पीएमआरडीए, महामेट्रोची समान मार्गांकडे धाव
निवडणूक विभागाचे काम महापालिकेच्या कामकाजाची मूळ जबाबदारी सांभाळून करणे अपेक्षित आहे. मात्र, निवडणूक विभागाचे काम असल्याचे सांगून महापालिकेच्या कामकाजाकडे कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजावर त्याचा परिणाम होत असून कामे रखडत आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी हा आदेश काढला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे बिनवडे यांनी या आदेशात नमूद केले आहे.