पुणे : राज्यात करोनाचा उपप्रकार जेएन.१ची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने करोना कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलाने सहव्याधीग्रस्त करोना रुग्णांना रेमडेसिवीर औषध देण्याची शिफारस केली आहे. याचबरोबर सरसकट सर्वच करोना रुग्णांना प्रतिजैविके देणे टाळावे, अशी सूचनाही केली आहे.
करोना कृती दलाने करोना रुग्णांवरील उपचारांबाबत सूचना केल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, जेएन.१ च्या रुग्णांमध्ये सर्दी, ताप, खोकला यासारखी फ्ल्यूची लक्षणे असू शकतात. याचबरोबर श्वास घेण्यास त्रास होण्याचेही लक्षण दिसू शकते. सहव्याधी नसणाऱ्या करोना रुग्णांना विषाणूप्रतिबंधक औषधे देण्याची आवश्यकता नाही. त्यांच्यावर लक्षणांनुसार उपचार करावेत. सहव्याधी असणाऱ्या करोना रुग्णांना तीन दिवस रेमडेसिवीरची मात्रा द्यावी अथवा निर्माट्रेलविर किंवा रिटोनाविर या गोळय़ा ५ दिवसांसाठी द्याव्यात. ही औषधे उपलब्ध नसतील तर मोलनुपीरावीर या गोळय़ा रुग्णाचे समुपदेशन करून द्याव्यात.
हेही वाचा >>>“श्रीराम माझ्या स्वप्नात येऊन म्हणाले, २२ जानेवारीला मी…”, लालू प्रसाद यादव यांच्या मुलाचं वक्तव्य
श्वसनविकाराचा त्रास असलेल्या करोना रुग्णांना रेमडेसिवीरची मात्रा ५ दिवसांसाठी द्यावी. करोना रुग्णांना सरसकट प्रतिजैविके देऊ नयेत. त्यांना इतर संसर्ग असल्यास आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांना आवश्यकतेनुसार प्रतिजैविके द्यावीत. सर्व करोना रुग्णांच्या फुफ्फुसाचे सीटी स्कॅन करण्याची गरज नाही. केवळ श्वसनविकार असलेल्या रुग्णांमध्ये ही तपासणी करावी, असेही टास्क फोर्सने म्हटले आहे.
स्टेरॉईडचा वापर टाळा
फ्ल्यूसदृश लक्षणे असलेल्या करोना रुग्णांना रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात स्टेरॉईड देऊ नयेत. रुग्णालयात दाखल आणि कृत्रिम ऑक्सिजची आवश्यकता असलेल्या रुग्णांनाच आवश्यकतेनुसार स्टेरॉईड द्यावेत. श्वसनविकार असलेल्या करोना रुग्णांमध्ये ऑक्सिजन पातळी ९४ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास डेक्सामेथासोन स्टेरॉईडचा वापर करावा, असे टास्क फोर्सने नमूद केले आहे.
कृती दलाच्या महत्त्वाच्या सूचना
’ करोना रुग्णांच्या सरसकट रक्त चाचण्या करू नयेत.
’ सर्वच करोना रुग्णांना स्टेरॉईड्स देऊ नयेत.
’ करोना रुग्णांना सरसकट प्रतिजैविके देऊ नयेत.
’ रुग्णालयातून रुग्णाला घरी सोडताना आरटीपीसीआर चाचणी नको.
’ करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह थेट नातेवाइकांकडे द्यावेत.