पुणे : करोना काळात खरेदी केलेल्या दोन लाख ४० हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या कुप्या (वायल्स) कालबाह्य झाल्या आहेत. याची किंमत २५ कोटी रुपये आहे. हा सर्व साठा कालबाह्य होण्यापूर्वी संबंधित कंपन्यांना पाठवून त्या बदल्यात इतर औषधांचा साठा मागवता आला असता. मात्र, आरोग्य विभागाकडून तशी कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली.
याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना पत्र पाठविण्यात आले आहे. चालू वर्षी १० एप्रिल रोजी मनसे जनाधिकार सेनेने आरोग्य विभाग संचालक नितीन आंबाडेकर यांच्याशी संपर्क केला होता. विभागाकडे असलेल्या २.४० लाख रेमडेसिव्हिरच्या कुप्या ३० एप्रिल रोजी कालबाह्य होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. मात्र, कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. २.४० लाख कुप्यांपैकी ४६ टक्के साठा पुण्यातील औंध उरो रुग्णालय येथे शिल्लक होता आणि उर्वरित साठा राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये होता. या कालबाह्य होणाऱ्या २५ कोटी रुपयांच्या रेमडेसिव्हिरच्या साठ्याबाबत आरोग्य विभागाने यंत्रणा राबविली किंवा कसे? हा साठा यापूर्वीच संबंधित कंपन्यांना परत पाठविला असता, तर त्या बदल्यात शासनाला इतर औषधांचा साठा मागविता आला असता. त्यामुळे हा साठा कालबाह्य होण्यामागे कोणते अधिकारी जबाबदार आहेत, याबाबत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी केली.