पुणे : जर्मन बेकरीत झालेल्या बाँम्बस्फोटाच्या कटू स्मृती आजही कायम आहेत. १३ फेब्रुवारी २०१० रोजी झालेल्या स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला होता, तसेच ५६ जण जखमी झाले होते. या स्फोटामुळे पुण्यात नव्हे, तर देशभरात खळबळ उडाली होती. जर्मन बेकरी बाॅम्बस्फोटाच्या घटनेला गुरुवारी (१३ फेब्रुवारी) पंधरा वर्षं पूर्ण होत आहेत. स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या निरपराधांना विविध संस्थांकडून यंदाही श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मेरे अपने संस्था आणि कोरेगाव पार्क भागातील रहिवाशांकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मौन बाळगण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत मौन बाळगण्यात येणार आहे. या कार्यक्रमात कोणीही भाषण करणार नाही, तसेच ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करण्यात येणार नाही. बाँम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुणेकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मेरे अपने संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब रुणवाल, कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने, दलित सेना संस्थेचे अध्यक्ष सुनील यादव, डाॅ. मानसी जाधव, जर्मन बेकरीच्या संचालक स्नेहल खरोसे यांनी केले आहे.
जर्मन बेकरीत १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बाॅम्बस्फोट झाला होता. बंदी घातलेल्या इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने बाँम्बस्फोट घडविला होता. जर्मन बेकरीत झालेल्या बाँम्बस्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला होता. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पाच परदेशी नागरिकांचा समावेश होता. याप्रकरणात इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या यासिन भटकल याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास करून मराठवाड्यातील उदगीरमधून हिमायत बेगला अटक केली होती. याप्रकरणात बेगला शिवाजीनगर न्यायालयाने २०१३ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. बेगने शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. जर्मन बेकरी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी बेगला टिपले होते. चित्रीकरणात बेग याच्याकडे पिशवी आढळून आली होती. बेग याच्याकडून स्फोटके जप्त करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने त्याची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
जर्मन बेकरी प्रकरणात चार आरोपी फरारी
याप्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेने मुख्य सूत्रधार यासिन भटकल, तसेच जैबुद्दीन अन्सारीला अटक केली होती. रियाज भटकल, फैयाज कागझी, मोहसीन चाैधरी, इक्बाल भटकल हे फरारी आहेत. रियाज भटकल आयसिसच्या संपर्कात आला होता. तो मारला गेल्याची शक्यता तपासयंत्रणांनी व्यक्त केली होती. कोंढव्यात वास्तव्यास असलेल्या मोहसीन चौधरीचा ठावठिकाणा लागलेला नाही.