चित्रपट, नाटक, साहित्य, संगीत आणि कला अशा सर्वच क्षेत्रात लीलया संचार करणारे पु. ल. देशपांडे यांच्या अष्टपैलूत्वाला अभिवादन करण्याबरोबरच या ‘खेळिया’चे स्मरण युवा पिढीसमोर जागे ठेवण्याच्या उद्देशातूनच ‘पुलोत्सव’ आयोजित केला जातो. बदलत्या काळानुसार बदललेल्या ‘पुलोत्सवा’ने तरुणाईकडे वाटचाल केली असून पुढच्या पिढीपर्यंत पुलंचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व पोहोचविण्यामध्ये मिळत असलेले यश ही पुलोत्सवाची फलश्रुती आहे, ‘आशय सांस्कृतिक’चे वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार यांनी ही भावना व्यक्त केली. यंदाचा ‘पुलोत्सव’ गुरुवारपासून (१७ डिसेंबर) सुरू होत असून हे तपपूर्ती वर्ष आहे.
पुलंच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून २००० मध्ये ‘पुलं बहुरूपी ८०’ समितीतर्फे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये आशय सांस्कृतिकचा सहभाग होता. पुलं आणि सुनीताबाई यांच्या आशीर्वादानेच आशय सांस्कृतिक संस्था बहराला आली. हे दोघे केवळ संस्थेचे आजीव सभासद किंवा मार्गदर्शकच नव्हते. तर, त्यांच्या पुढाकारातून अनेक नवीन कार्यक्रम आशय सांस्कृतिकने रसिकांसमोर सादर केले. लघुपट या अभिव्यक्तीच्या नव्या माध्यमाकडे लक्ष दिले पाहिजे, असे सांगत पुलंनीच आम्हाला लघुपट महोत्सव सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले. फग्र्युसन महाविद्यालयाचे अॅम्फी थिएटर उपलब्ध करून देतानाच पुलंनी ३५ एमएमचे दोन प्रोजेक्टर देखील आशय सांस्कृतिकला घेऊन दिले होते, असा ‘आशय’शी असलेला ऋणानुबंध वीरेंद्र चित्राव यांनी उलगडला.
पुलंना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांचे बहुरूपीत्व रसिकांसमोर उलगडणारा महोत्सव चिरस्थायी असावा, अशी कल्पना आम्ही पुलं आणि सुनीताबाई यांच्यासमोर मांडली आणि ‘पुलोत्सवा’चे मूर्त स्वरूप त्यातून साकारले गेले. पहिल्या तीन महोत्सवांनंतर आता हा पुलोत्सव हळूहळू तरुणाईकडे नेला पाहिजे, अशी भूमिका सुनीताबाईंनी मांडली. त्यामध्ये उदयोन्मुख कलाकारांच्या शास्त्रीय गायन-वादनाच्या मैफलीचा ‘पालवी’ हा कार्यक्रम, पुलं तरुणाई सन्मान आणि युवा दिग्दर्शकांच्या लघुपटांचा महोत्सव असे नावीन्यपूर्ण कार्यक्रम ‘पुलोत्सवा’मध्ये आले. पुलंच्या नावाने महोत्सव साजरा होत असताना दर्जा कायम ठेवला आहे. त्यामध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही. नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचे मानदंड प्रस्थापित करीत नव्या पिढीपर्यंत पुलंचे स्मरण ताजे ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, असे सतीश जकातदार यांनी सांगितले.
शो मस्ट गो ऑन
– पुलंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पूर्वी ८ नोव्हेंबरपासून पुलोत्सव सुरू केला जात होता. ७ नोव्हेंबर १९९८ रोजी पं. जितेंद्र अभिषेकी यांचे निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच दिवशी रात्री भरत नाटय़ मंदिर येथे होणाऱ्या ‘वैभव नाटय़संगीता’चे कार्यक्रमात शौनक अभिषेकी यांचा सहभाग होता. अंत्यसंस्कार झाल्यानंतर शौनक रात्री कार्यक्रमामध्ये केवळ सहभागी झाले असे नाही. तर, ‘माझे जीवनगाणे’ हे गीत सादर करून त्यांनी अभिषेकीबुवांना अभिवादन केले.
– पुलोत्सवा’च्या मार्गदर्शक सुनीताबाई देशपांडे यांचे ७ नोव्हेंबर २००९ रोजी निधन झाले. दुसऱ्या दिवशी ‘पुलोत्सवा’मध्ये अभिनेते नाना पाटेकर यांना पुलं स्मृती सन्मान प्रदान केला जाणार होता. खुद्द नाना तयार नव्हते. पण, ‘शो मस्ट गो ऑन’ असे सांगत सुनीताबाईंच्या कुटुंबीयांनी पुलोत्सव झालाच पाहिजे, अशी भूमिका घेतली आणि नानांनी हा पुरस्कार स्वीकारला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा