ज्येष्ठ मार्क्सवादी नेते व पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध करत पुण्यातील विविध संस्था व संघटनांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीने तीव्र निषेध केला. दाभोलकर आणि पानसरे यांचा एकाच उद्देशाने खून झाला, असे मत व्यक्त करून या कृत्याच्या विरोधात वारजे पुलाजवळ निदर्शनाचे आयोजन केले आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अॅड. अभय छाजेड यांनी पानसरे यांना श्रद्धांजली अर्पण केली व पक्षाच्या वतीने ‘महाराष्ट्र बंद’ ला पाठिंबा जाहीर केला. रिपब्लिकन युवा मोर्चानेही या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे राहुल डंबाळे यांनी जाहीर केले.
शिवराय विचार पथारी संघटनेतर्फे आयोजित श्रद्धांजली सभेत पानसरेंच्या प्रतिमेस श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सध्या नथूराम गोडसे प्रवृत्तीने जोर घेतला आहे आणि याच प्रवृत्तीने नरेंद्र दाभोलकर व कॉ. पानसरेंचा बळी घेतला आहे, असे संस्थेचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर यांनी सांगितले. दलित पँथर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिव संग्राम व लहुजी महाराज संघातर्फे देखील या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच, अंधार युग येऊ नये या बाबतीत दक्षता घेण्यात यावी असा संदेश देखील देण्यात आला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने २३ फेब्रुवारी रोजी पानसरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आदरांजली सभेचे आयोजन केले आहे.

Story img Loader