खडकवासला धरणातून १.५ टीएमसी पाणी सोडण्याबाबत आदेश असल्याचे स्पष्टीकरण पाटबंधारे विभागाने दिले असले, तरी हे पाणी सोडून झाल्यानंतरही अतिरिक्त पाणी सोडण्याबाबत निर्णय का घेण्यात आला, याचा खुलासा करण्याची मागणी सजग नागरी मंचने पाटबंधारे विभागाकडे केली आहे. त्याचप्रमाणे धरणे ९५ टक्के भरली असल्याने आचारसंहिता लागण्यापूर्वी पुणेकरांना दोनवेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
शहरातील नागरिकांना एकवेळ पाणी मिळत असताना खडकवासला धरणातून मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जात असल्याबाबत सजग नागरी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी पाटबंधारे विभागाला निवेदन दिले होते. त्यानुसार पाटबंधारे विभागाने पाणी सोडल्याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. दौंड, इंदापूर या भागामधील तलाव भरण्यासाठी १.५ टीएमसी पाणी सोडण्याबाबत परवानगी मिळाली होती, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, हे पाणी सोडून झाल्यानंतरही शेतकऱ्यांची मागणी नसताना व कालवा समितीची बैठक न घेता पुन्हा १.५ टीएमसी पाणी कुणाच्या परवानगीने सोडण्यात आले? त्याचप्रमाणे, खडकवासला धरणातील पाणीसाठा ८० टक्क्य़ांपर्यंत खाली आल्यावर कालव्यातून पाणी सोडणे का थांबविण्यात आले नाही, याचा खुलासा करावा, अशी मागणी सजग नागरी मंचने केली आहे.
गणेश विसर्जनासाठी नदीत पाच हजार क्युसेकने पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे धरणातील साठा आणखी खाली येईल. हे माहीत असतानाही कालव्यातून अतिरिक्त पाणी सोडणे का सुरू ठेवले, याचाही खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे. मंचच्या वतीने पालिका आयुक्तांनाही निवेदन देण्यात आले आहे.  भविष्यात सर्व धरणे भरतील, असा विश्वास बाळगून पाटबंधारे विभाग १४०० क्युसेकने कालव्यातून विसर्ग करीत असताना, धरणे भरणार नाहीत, या भीतीने पुणेकरांना एकवेळ पाणीपुरवठय़ाचा आग्रह कशासाठी? पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे ९५ टक्के भरली असल्याने व अजून पावसाळा एक महिना शिल्लक असल्याने आचारसंहिता लागण्यापूर्वी पुणेकरांना दोनवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यात नोंदविण्यात आली आहे.