पिंपरी-चिंचवड शहरातील ‘डायनोसॉर उद्यान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानाचे चार कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात येणार आहे. दुबईतील ‘मिरॅकल गार्डन’च्या धर्तीवर रंगीबेरंगी व आकर्षक फुलांनी हे उद्यान बहरणार आहे. बुधवारी महापौर शकुंतला धराडे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते नूतनीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपळे गुरव येथे २००६ मध्ये दोन कोटी रुपये खर्च करून हे उद्यान उभारण्यात आले. जॉगिंग ट्रॅक, दाट झाडी, आकर्षक कारंजे व विस्तीर्ण परिसरात डायनोसॉरची भव्य मूर्ती हे उद्यानाचे आकर्षण होते. भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) या कंपनीकडे सुरुवातीला उद्यानाच्या देखभालीचे काम होते. हजारो नागरिकांचा वावर असणाऱ्या या उद्यानाचे नंतर पालिकेच्या उद्यान विभागाकडे हस्तांतरण करण्यात आले. आमदार जगताप यांनी दुबईतील ‘मिरॅकल’ उद्यान पाहिले असता, त्या पद्धतीने जिजाऊ उद्यानात सुधारणा करण्याचा निर्णय घेत त्यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार, महापालिकेने या नूतनीकरणासाठी चार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बुधवारी सकाळी महापौर व आमदारांच्या हस्ते उद्यानाच्या नूतनीकरणास प्रारंभ झाला. अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके, शिक्षण मंडळाचे सभापती चेतन भुजबळ, स्थानिक नगरसेवक रामदास बोकड, वैशाली जवळकर, शैलजा शितोळे, सुषमा तनपुरे आदी उपस्थित होते. या उद्यानामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडणार असल्याचे महापौरांनी नमूद केले.

देशातील तसेच परदेशातील विकसित उद्याने बघणे सामान्य नागरिकांना शक्य नाही. त्यामुळे तेथील उद्याने आपल्याकडे साकारण्याचा हा प्रयत्न असल्याचे आमदार जगताप यांनी या वेळी सांगितले. नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. सूत्रसंचालन रमेश भोसले व किशोर केदारी यांनी केले. दरम्यान, याच वेळी सांगवी पोलीस ठाण्यात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन महापौर व आमदारांच्या हस्ते झाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renovation of dinosaur garden in pimpri chinchwad