पुणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजीमहाराज सभागृहाच्या नूतनीकरणाचा प्रारंभ आणि कामाचे भूमिपूजन शनिवारी महापौर चंचला कोद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च होणार असून या कामानंतर सभागृहाचा चेहरा पूर्णपणे बदलून जाणार आहे.
महापालिका सभागृहाचे यापूर्वी २००२
मध्ये नूतनीकरण करण्यात आले होते. आगामी सन २०१७ च्या निवडणुकीनंतर महापालिका सदस्यांच्या संख्येत वाढ होणार असल्यामुळे नूतनीकरणाबरोबरच सभागृहातील आसनसंख्येतही वाढ केली जाणार आहे. सध्याच्या सभागृहात १६२ सदस्यांसाठी आसनव्यवस्था असून नव्या सभागृहात १८४ सदस्यांसाठी आसनव्यवस्था केली जाणार आहे.
या कामाचे भूमिपूजन महापौर चंचला कोद्रे आणि आयुक्त महेश पाठक यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, सभागृहनेता सुभाष जगताप, विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे, भाजपचे गटनेता अशोक येनपुरे, शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
सभागृहातील आसनव्यवस्थेसाठी अर्धगोलाकृती चार टप्पे केले जाणार आहेत. प्रत्येक टप्प्याची उंची तीन इंच असेल. सध्याच्या सभागृहात २८ अधिकाऱ्यांसाठी आसनव्यवस्था असून नव्या सभागृहात ५० अधिकाऱ्यांसाठी आसनव्यवस्था केली जाणार आहे. पुढील तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.