पिंपरी : चिंचवडमधील संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयावर नूतनीकरण, सुशोभीकरणाच्या नावाखाली २० कोटी रुपये खर्च केल्यानंतर आता पुन्हा सुशोभीकरणासाठी २४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. आठ वर्षांपासून पर्यटकांसाठी बंद असलेल्या या संग्रहालयास आणखी वर्षभर टाळे असणार आहे. त्यामुळे पर्यटकांची निराशा झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पशू-पक्ष्यांची माहिती व्हावी, या उद्देशाने महापालिकेने चिंचवड येथील संभाजीनगरमध्ये एमआयडीसीच्या सात एकर जागेमध्ये १९८९ मध्ये बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालय उभारले. या संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी मे २०१६ ला सुरुवात झाली. तेव्हापासून संग्रहालयाला टाळे आहे. प्राणिसंग्रहालयासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. २० कोटी रुपये खर्च करून आणि आठ वर्षे काम करूनही प्राणिसंग्रहालयाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले नसून, संग्रहालयाला टाळे आहे. या कामात गैरव्यवहार झाल्याचा आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ३६ प्राणी, पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
हेही वाचा >>>भाजप आमदार राम शिंदे यांचा गुंड निलेश घायवळ यांच्यावर वरदहस्त : आमदार रोहित पवार
सुशोभीकरणाची कामे पूर्ण झाल्यानंतर प्राणिसंग्रहालय महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडे (एफडीसीएम) हस्तांतरित करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. महामंडळाने महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार या प्राणिसंग्रहालयाचे काम लवकरात लवकर सुरू करून ते पूर्ण करावे. पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, त्याप्रमाणे सेवा-सुविधा निर्माण करण्याबाबत सूचना केली आहे. त्यामुळे महापालिकेने जुनी निविदा रद्द केली. संग्रहालयासाठी एक तज्ज्ञ अधिकारी नियुक्त केला. तसेच सल्लागार बदलण्यात आला. आता आराखड्यात बदल व सुधारणा करून नव्याने निविदा प्रक्रिया राबविली आहे.
२४ कोटींची निविदा
प्राणिसंग्रहालय सुशोभीकरणाच्या उर्वरित कामाची २४ कोटी दोन लाख १६ हजार ६८ रुपये खर्चाची निविदा स्थापत्य उद्यान विभागाने प्रसिद्ध केली आहे. या कामाची मुदत एक वर्ष आहे. २६ ऑगस्टला निविदा उघडल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या सूचनेनुसार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार संग्रहालयाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. काम पूर्ण होईपर्यंत संग्रहालय बंदच राहणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर संग्रहालय ‘एफडीसीएम’ यांच्याकडे द्यायचे की नाही, याबाबतचा निर्णय होईल. कदाचित महापालिकेकडेही कायम राहील, स्थापत्य उद्यान विभागाचे सह शहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितले.