पुणे : राज्यातील पुरातन मंदिरांचे जतन आणि संवर्धनाच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेल्या तीन मंदिरांचा जीर्णोद्धार अंतिम टप्प्यात आहे. धूतपापेश्वर (राजापूर- रत्नागिरी), खंडोबा मंदिर (छत्रपती संभाजीनगर) आणि पुरुषोत्तम पुरी (माजलगाव-बीड) मंदिरांचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. उर्वरित कोपेश्वर (खिद्रापूर-कोल्हापूर), गोंदेश्वर (सिन्नर-नाशिक), शिवमंदिर मार्कंडेय (चार्मोशी-गडचिरोली), आनंदेश्वर (लासूर- अमरावती), उत्तरेश्वर (सातारा) आणि एकवीरादेवी (कार्ला-पुणे) या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य शासनाने २०१९ मध्ये इतिहासकालीन, प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील धूतपापेश्वर, कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर, पुणे जिल्ह्यातील एकवीरा देवी, नाशिक जिल्ह्यातील गोंदेश्वर, औरंगाबाद जिल्ह्यातील खंडोबा, बीड जिल्ह्यातील भगवान पुरुषोत्तम, अमरावती जिल्ह्यातील आनंदेश्वर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शिवमंदिराचा समावेश आहे. मंदिराचे मूळ रूप टिकवून जीर्णोद्धार करण्यात येत आहे. तसेच परिसराचा विकास करताना भाविकांच्या सोयी-सुविधा, वाहनतळ, स्वच्छतागृह, दर्शन मार्ग, दुकानांची मांडणी आदीबाबत निर्णय घेऊन विकासकामे हाती घेण्यात आली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून (एएसआय) मंजुरी घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> पुणेकरांच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले… पालकमंत्र्यांची प्रतीक्षा

पुरातन मंदिराच्या कामासाठी पुरातत्त्व विभागाकडून परवानगी घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात धूतपापेश्वर मंदिरासाठी १० कोटी रुपये, खंडोबा मंदिर ७ कोटी आणि पुरुषोत्तम पुरी या मंदिरांसाठी ६ कोटी रुपयांचा दुरुस्ती आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार निविदा काढून २३ कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली.

हेही वाचा >>> ‘ईव्हीएम’विरोधात आता न्यायालयात धाव ‘हे’ आहे कारण !

प्राचीन वास्तूच्या दृष्टीने जतन-संवर्धनाबरोबरच मूळ वास्तूला कोणताही धक्का न लावता ही मंदिरे उजळवली गेली आहेत. चुनखडी आणि गुळाचा लेप तयार करून मंदिरांचा कायापालट करण्यात आला आहे. दगडी खांबांना पडलेल्या भेगा, पायऱ्यांची डागडुजी, तुटलेल्या पायऱ्यांची दुरुस्ती आणि भाविकांच्या दृष्टीने मूलभूत सुविधांची कामे करण्यात आली आहेत, अशी माहिती एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली.

गुळाचा लेप आणि चुनखडी कशासाठी?

पूर्वी दगडी बांधकाम केले जात असते. विटा आणि वाळू यांचा समावेश नसायचा. नवीन बांधकामातील साहित्यानुसार, विटा आणि वाळू वापरली, तर मंदिराचे प्राचीन रूप बदलण्याची शक्यता असते. जुने बांधकाम दगडी असल्याने ऊन, वारा, पाऊस यामुळे दगड जीर्ण होतो. त्याची मूळ जागा सोडून, तयार झालेल्या भेगा सांधण्यासाठी चुना वापरला जातो. या चुन्याला ‘हायड्रॉलिक लाइम’ असे म्हणतात. ‘हायड्रॉलिक लाइम’ पाण्यासोबत मिसळून जास्त काळ ठेवून सांधा, भेगा भरण्याच्या प्रक्रियेला ‘स्लॅकिंग ऑफ लाइम’ असे म्हणतात. जुन्या पद्धतीने बांधलेल्या मंदिराचे रूप त्या पद्धतीनेच दिसावे, तसेच डागडुजी केल्याच्या खुणाही दिसू नयेत म्हणून गुळाचे मिश्रण वापरले जाते, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आले.

या मंदिरांची कामे सुरू होणार

कोल्हापूर – कोपेश्वर मंदिर (खिद्रापूर)

नाशिक – गोंदेश्वर (सिन्नर)

गडचिरोली – मार्कंडेय शिवमंदिर (चार्मोशी)

अमरावती – आनंदेश्वर (लासूर)

सातारा – उत्तरेश्वर

पुणे – एकवीरा देवी (कार्ला)

महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे, शिल्प व लेणींचे जतन-संवर्धन करण्यासाठी राज्यातील नऊ मंदिरांचे काम दोन टप्प्यांत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ३९ कोटी ४३ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील तीन मंदिरांचे काम पूर्णत्वाच्या दिशेने आहे, तर उर्वरित सहापैकी काही मंदिरांचे काम सुरू करण्यात आले आहे. वेगवेगळ्या विभागांची कामे असल्याने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निविदाप्रक्रिया रखडल्या होत्या. आता या मंदिरांच्या कामाला वेग येईल. – राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renovation work of three heritage temples in maharashtra in its final stages pune print news vvp 08 zws