अनाथ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या आणि अनाथांची माय या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ (७४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. सिंधुताईंच्या निधनामुळे त्यांनी आधार दिलेल्या सर्वांनी आपण पुन्हा एकदा अनाथ झाल्याची भावना व्यक्त केली असून संपूर्ण महाराष्ट्रातच शोककळा पसरली आहे. सिंधुताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
हडपसर येथील मांजरी परिसरात असलेल्या सन्मती बाल निकेतन संस्थेत माईंचं पार्थिव आणण्यात आल होतं. या ठिकाणी अंत्यदर्शन घेतल्यानंतर ठोसरपागा स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात महानुभाव पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे निधन
सिंधुताई या महानुभाव पंथाचे आचरण करत होत्या, त्या कृष्णभक्त होत्या. त्यामुळेच सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर महानुभाव पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार न करता दफन करण्यात आलं. महानुभाव पंथामध्ये केल्या जाणाऱ्या अंत्यसंस्काराला ‘निक्षेप’ असं म्हटलं जातं.
सिंधुताई दीड हजारांहून अधिक अनाथ मुला-मुलींचे त्या संगोपन करीत होत्या. सिंधुताई सपकाळ यांना गेल्या वर्षी ‘पद्मश्री‘ने गौरवण्यात आले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या दीड महिन्यांपूर्वी त्यांना पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या काळात त्यांच्यावर हार्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच सिंधुताईंना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.