कोथरूडमधील पावसाळी चेंबरच्या झाकणांची दुरुस्ती लोकसहभागातून करण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आशिष गार्डन परिसरातील खचलेल्या झाकणांची दुरुस्ती करण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने इतरही भागातील खचलेल्या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत.कोथरूडमधील अनेक ठिकाणी पावसाळी वाहिन्या आणि चेंबरच्या झाकणे खचल्याने खड्डे निर्माण झाले होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याच्या अनेक तक्रारीही सातत्याने वाहनचालकांकडून करण्यात येत होत्या. त्यामुळे लोकसहभागातून रस्ते दुरुस्तीची कामे करण्याचा निर्णय कोथरूडचे आमदार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे.
हेही वाचा >>>पुणे: कर्ज मंजुरीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी संगणक अभियंत्याला २७ लाखांना फसविले
पहिल्या टप्प्यात आशिष गार्डन परिसरातील खचलेल्या पावसाळी वाहिन्या आणि चेंबरची दुरुस्ती करण्यात येत आहे. आशिष गार्डन परिसरातील काम पूर्ण झाले असून परिसरातील अन्य ठिकाणची कामेही या माध्यमातून करण्यात येणार आहेत.यंदा मुसळधार पावसामुळे कोथरुडमधील रस्त्यांची दुरावस्था झाली होती. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे लहान-मोठ्या अपघाताच्या घटनाही घडल्या होत्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याची सूचनाही महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांना केली होती.