पुणे : रेल्वे प्रतिकृतींचे संग्रहालय असलेल्या ‘जोशीज् म्युझिअम ऑफ मिनीएचर रेल्वेज्’मध्ये पुणे मेट्रोच्या प्रतिकृतीची निर्मिती करण्यात आली असून, ट्रेन मॉडेलिंगचा छंद जोपासू पाहणाऱ्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या संग्रहालयाच्या संकेतस्थळावर एक विशेष विभाग विकसित करण्यात आला आहे. जोशी रेल्वे संग्रहालयाच्या २७ व्या वर्धापन दिनी भिलवडी येथील प्रसिद्ध चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे यांंच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. संग्रहालयाचे देवव्रत जोशी आणि रवी जोशी या वेळी उपस्थित होते.

चितळे म्हणाले, ‘कला आणि विज्ञान यांचा अनोखा मिलाफ असलेले हे संग्रहालय आपल्या जीवनाचा महत्त्वाचा घटक असलेल्या रेल्वेच्या विविध प्रकारांची माहिती अतिशय रंजकपणे उपलब्ध करून देते. भारतातील मेट्रोचे जाळे वाढत आहे. तसेच भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण आंतरराष्ट्रीय दर्जाचे होते आहे. त्यामुळे तरुण पिढीला येथील चालते-फिरते रेल्वेचे प्रकार समजण्यास आणखी सोपे झाले आहे.

‘गेल्या वर्षी आम्ही वंदे भारत या रेल्वेच्या प्रतिकृतींचे ६०० नग तयार करून दिले होते. यंदा आम्ही पुणे मेट्रोची प्रतिकृती तयार करत आहोत. लवकरच पुणे मेट्रोच्या या प्रतिकृती काही मेट्रो स्थानकांवर उपलब्ध होतील,’ अशी माहिती रवी जोशी यांनी दिली.