राज्यात सत्तांतरानंतर अगोदर विरोधकांकडून मंत्रिमंडळ विस्तारावरून आणि नंतर जिल्ह्यांना पालकमंत्री कधी मिळणार? असा प्रश्न करत विरोधी पक्षांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात होती. अखेर काल(शनिवार) राज्य सरकारकडून राज्यभरातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक-दोन नाहीतर तब्बल सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आल्याचे दिसून आले. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. तर, अजित पवारांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.
“माझ्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं, तर माझ्या नाकीनऊ आलं होतं, ते सहा जिल्ह्यांचा कारभार कसा सांभाळणार आहेत? असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला होता.”
फडणवीसांनी ६ जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेतल्यावरून अजित पवारांचा खोचक टोला; म्हणाले…
यावर प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “येत्या काळात कधी जर त्यांचं राज्य आलच आणि त्यांनाही जर दोन-चार जिल्हे पाहायचे असतील, तर ते कसे सांभाळायचे. याचा मी त्यांना निश्चित गुरुमंत्र देईन. मात्र हे सगळे जिल्हे नियोजनमंत्री म्हणून माझ्याकडे आहेत. मी तर अख्खा महाराष्ट्र सांभाळला आहे. त्यामुळे सहा जिल्ह्याचं काय घेऊन बसलात.”
काय म्हणाले होते अजित पवार? –
“शिंदे-फडणवीस सरकारने शनिवारी पालकमंत्र्यांची घोषणा केली. काही जिल्ह्यांमध्ये एकच पालकमंत्री दिले आहेत. तर काही पालकमंत्र्यांकडे दोन जिल्हे दिलेआहेत. माझ्या माहितीप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सहा जिल्हे देण्यात आले आहेत. माझ्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद होतं, तर माझ्या नाकीनऊ येत होतं. आठवड्यातून किमान एक दिवस मला जिल्ह्यासाठी द्यावाच लागत होता. त्यामुळे ज्यांच्याकडे सहा-सहा जिल्हे दिले आहेत, ते त्यांना कसं पेलवणार आहे, हे मला माहीत नाही, परंतु त्यांना माझ्या शुभेच्छा.”, असं अजित पवार भाषणात म्हणाले होते.