भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. त्या घटनेला ६५ वर्षे होत असून २६ नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करून लोकशाही संपन्न करू या, असे आवाहन शिक्षक हितकारिणी संघटनेने केले आहे.
घटना परिषदेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना देशाला अर्पण केली. त्यानंतर दोन महिन्यांनी २६ जानेवारी १९५० पासून या घटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था उभी केली. त्याचे उत्तरदायित्व म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. या विषयी समाजामध्ये पुरेशी जागरूकता नसल्याने लोकशाहीवर निष्ठा असलेल्या संघटनांच्या मागणीनुसार राज्य सरकारने २००८ मध्ये शासकीय अध्यादेश काढला आहे, अशी माहिती शिक्षक हितकारिणी संघटनेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश पवार यांनी दिली.
संविधान दिन साजरा करण्यासंदर्भात राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतलेला असला, तरी संविधान दिन साजरा करण्याबाबत मोठी उदासिनता दिसून येते. केवळ शासकीय पातळीवर हा दिवस साजरा केला जात असून संविधान दिन हा लोकोत्सव व्हावा. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, शासकीय कार्यालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर संविधान दिन साजरा करून लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट करावी, असे आवाहन प्रकाश पवार यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा