पुण्यात लाखोंच्या संख्येने हक्काचे मतदार असले, तरी कायम कोणत्या तरी पक्षाच्या वळचणीला गेल्याने कधीही एकसंघ राहिला नसलेला पक्ष म्हणजे भारतीय रिपब्लिकन पक्ष (आरपीआय). निवडणूक आयोगाकडे या पक्षाचे वेगवेगळे गट नोंदणीकृत आहेत. त्यापैकी पुण्यात खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआय (ए) गटाचे अस्तित्व आहे. मात्र, या गटाने २०१४ नंतर एकही निवडणूक स्वबळावर लढविली नसल्याने या पक्षाला हक्काचा मतदार नक्की कोणाकडे आहे, हे आजमावता आलेले नाही. त्यामुळे कायम दुसऱ्या मोठ्या पक्षाशी मैत्रीचा हात पुढे करत मिळेल ते पद पदरात पाडून घेण्यातच या पक्षाने समाधान मानले असल्याचे चित्र आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघावर या पक्षाने दावा केला असला, तरी मित्रपक्ष भाजप त्यांच्या मागणीकडे किती गांभीर्याने घेईल, याबाबत या पक्षामध्येच साशंकता आहे.
पुण्यात आरपीआयची हक्काची मतदारसंख्या लाखो आहे. मात्र, या मतदारांचे कायम विभाजन होत आले आहे. राष्ट्रीय पक्षांचा कल हा आरपीआयच्या कोणत्याही एका गटाचा पाठिंबा मिळविण्याकडे राहिला आहे. त्यातून हा पारंपरिक मतदार आपल्याकडे असल्याचे भासविले जाते. त्यातून या मतांचे ध्रुवीकरण होत आले आहे. त्यामुळे या मतदारांच्या ताकदीचा अंदाज या पक्षाला घेता आलेला नाही.
हेही वाचा : पिंपरी- चिंचवड: वर्दळीच्या डांगे चौकात कचऱ्याचे ढीग
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत १९९७ नंतर आरपीआयला कधीच घवघवीत यश मिळू शकलेले नाही. १९९७ च्या निवडणुकीत या पक्षाचे सात नगरसेवक स्वबळावर निवडून आले होते. २०१२ च्या निवडणुकांमध्ये या पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. तेव्हा अवघे दोन नगरसेवक निवडून आले. २०१७ च्या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविल्याने पाच नगरसेवक विजयी झाले होते. यावरून कोणत्या तरी पक्षाच्या पाठिंब्यावर या पक्षाला यश मिळालेले दिसते. त्यामुळे कायम मोठ्या पक्षांच्या वळचणीला जाऊन यश पदरात पाडून घेण्याच्या या पक्षाच्या कार्यपद्धतीमुळे ताकद असूनही त्याकडे अन्य पक्ष हे काणाडोळा करत आले आहेत. मात्र, कोणतीही निवडणूक आली की, या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तेवढ्यापुरते सन्मानाची वागणूक दिली जाते. निवडणुकांची धामधूम संपली की, या पक्षाचा सोयीस्कर वापर करून घेतला जात असल्याची स्थिती आहे.
लोकसभा निवडणुकीत हा पक्ष कायम कोणत्या तरी पक्षाला पाठिंबा देत आला आहे. मात्र, विधानसभा निवडणुकांचा धांडोळा घेतल्यास या पक्षाने काही विधानसभा मतदारसंघात छाप टाकलेली दिसून येते. २००९ मध्ये या पक्षाने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात रोहिदास गायकवाड यांनी आरपीआय आठवले गटाकडून निवडणूक लढविली. त्याचवेळी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून या पक्षाचे उमेदवार परशुराम वाडेकर यांनी पक्षाची ताकद दाखवून दिली होती. त्यांनी चौथ्या क्रमांकाची मते मिळविली होती. वडगाव शेरी या मतदारसंघातून सय्यद अफसर इब्राहीम यांना उमेदवारी देण्यात आली होती. ते पाचव्या क्रमांकावर राहिले होते.
हेही वाचा : ‘डेटिंग ॲप’च्या जाळ्यात ओढून लुटमार करणारी टोळी गजाआड, पुणे शहरासह, ग्रामीण भागात गुन्हे केल्याचे उघड
विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत वाडेकर यांनी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूूक लढविली. ते तिसऱ्या स्थानावर राहिले होते. त्याचवेळी माजी नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी वडगाव शेरी मतदारसंघात आरपीआय आठवले गटाकडून निवडणूक लढवून चांगली लढत दिली होती. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत या पक्षाने भाजपला साथ देत एकाही मतदारसंघात निवडणूक लढविली नाही. त्यामुळे या पक्षाची हक्काची मते सध्या कोणाकडे आहेत, याच अंदाज या पक्षाला बांधता आलेला नाही.
आरपीआयच्या आठवले गटाने पुण्यात कायम अस्तित्व टिकवून ठेवले आहे. मात्र, आरपीआयच्या अन्य गटांचे स्थान नगण्य आहे. मोठे राजकीय पक्षही कायम या मतांचे ध्रुवीकरण कसे होईल, यावर भर देत आले आहेत. त्यामुळे आपल्याच ताकदीची जाणीव नसल्यासारखी आरपीआयची स्थिती आहे.
sujit.tambade@expressindia. com