काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून शहर काँग्रेसमध्ये खदखदत असलेला असंतोष अखेर उफाळून आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेस टिकवायची असल्यास भोईरांना शहराध्यक्षपदावरून हटवावे, अशी भूमिका प्रमुख कार्यकर्त्यांनी घेतली आहे. यासंदर्भात, सर्वाच्या सह्य़ा घेऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व संपर्कमंत्री हर्षवर्धन पाटील यांना भेटण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
पिंपरी गावात माजी नगरसेवक दत्ता वाघेरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीस शहराध्यक्षांना न बोलावता प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. गौतम चाबुकस्वार, कैलास कदम, बाबा तापकीर, तुकाराम भोंडवे, राजू गोलांडे, जयश्री गावडे, मनोहर पवार, सतीश दरेकर, अशोक मोरे, सुदाम ढोरे, अॅड. सुशील मंचरकर, भाऊसाहेब मुगुटमल, शेखर अहिरराव, गणेश लंगोटे, नरेंद्र बनसोडे आदींसह भोईर समर्थक ज्योती भारती उपस्थित होत्या. यावेळी झालेल्या गरमागरम चर्चेत भोईरांच्या कार्यपध्दतीवर तीव्र संताप व्यक्त करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी ज्येष्ठांना डावलून नको त्यांना प्रवेश दिला गेला. मुख्यमंत्री-संपर्कमंत्री काम करत नाही, फक्त माणिकराव करतात, अशी खोटी शेरेबाजी करण्यात आली. वास्तविक मुख्यमंत्री व संपर्कमंत्रीच येथील कामे करतात. मात्र त्यांना शहराध्यक्षांकडून सहकार्य केले जात नाही, बोलावले जात नाही. चिंचवड विधानसभेत दारूण पराभव झाला, ‘मॅचफिक्सींग’च्या राजकारणामुळे पालिका निवडणुकीत १२८ जागांवर उमेदवार दिले नाही, याची जबाबदारी स्वीकारून शहराध्यक्षांनी राजीनामा द्यायला हवा होता. मात्र, त्यांनी तो दिला नाही. आपण राजीनाम्याची मागणी करूया, शहरात काँग्रेस वाढवायची व टिकवायची असेल तर भोईरांना हटवले पाहिजे, अशी भूमिका मांडण्यात आली. बाबू नायर यांनी पक्षाचे वाटोळे चालवले आहे. हनुमंत गावडे, श्रीरंग बारणे व भोईर या तीनही शहराध्यक्षांच्या काळात वैयक्तिक स्वार्थापोटी त्यांनी नको ते उद्योग केले आहेत. ‘कामे करा, पदे चालून येतील’ असे राहुल गांधी यांनी पुण्यात सांगितले, त्यातून प्रेरणा घेऊन कामाला लागण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. अन्नसुरक्षा कायदा, जमीन अधिग्रहण कायदा, नेहरू अभियान आदींच्या माध्यमातून केंद्र सरकारने घेतलेले निर्णय सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे व पक्षाचे बळ वाढवण्याचे काम प्राधान्याने करणार असल्याचे सांगण्यात आले.
‘पिंपरीत काँग्रेस टिकवायची असल्यास भाऊसाहेब भोईर यांना हटवा’
काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून शहर काँग्रेसमध्ये खदखदत असलेला असंतोष अखेर उफाळून आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेस टिकवायची असल्यास भोईरांना शहराध्यक्षपदावरून हटवावे, अशी भूमिका प्रमुख कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
आणखी वाचा
First published on: 30-09-2013 at 02:38 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Repulse to bhausaheb bhoir for preprimary of pimpari congress