घुमान येथील साहित्य संमेलनास जाण्यासाठी पुणे आणि नाशिक ते अमृतसर प्रवासातील रेल्वे भाडय़ामध्ये सवलत मिळावी यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामार्फत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना साकडे घातले आहे.
घुमान साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोशाध्यक्ष सुनील महाजन यांनी शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेऊन संमेलनाच्या तयारीसंबंधीची माहिती दिली. त्यावेळी पवार यांनी संमेलनासाठी सर्वतोपरी मदत करण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला. संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमास शरद पवार उपस्थित राहणार असल्याचे भारत देसडला यांनी सांगितले. साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेमध्ये ‘मराठी भाषेच्या विकासासाठी महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी कसे पाहिले आणि भविष्यात कसे पाहिले पाहिजे’ या विषयावर शरद पवार यांच्या लेखाचा समावेश असेल, असेही त्यांनी सांगितले.
संयोजन समितीतर्फे साहित्यिकांना विमानाने प्रवास घडविण्याची संकल्पना रद्दबादल झाली आहे. तर, दुसऱ्या बाजूला रेल्वे प्रवास आणि घुमान येथील तीन दिवसांचा निवास आणि भोजनव्यवस्था ही केवळ तीन हजार रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या खर्चाचा ताळमेळ बसविण्याच्या उद्देशातून रेल्वे प्रवासामध्ये सवलत मिळावी अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केली. शरद पवार यांनी त्वरित रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी संवाद साधून त्यांना विनंती केली, अशी माहिती भारत देसडला यांनी दिली.
पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल आणि केंद्रीयमंत्री हरसिमरन कौर यांच्याशी संपर्क साधून पवार यांनी पंजाब सरकारने संमेलनास मदत करण्याची विनंती केली. अमृतसर ते घुमान हा रस्ता तातडीने दुरुस्त करून घ्यावा, अशी सूचनाही पवार यांनी बादल यांना केली आहे. आपल्या साहित्यिकांचे वय ही बाब ध्यानात घेऊन त्यांना प्रवासादरम्यान आणि तेथील निवासव्यवस्था आणि अन्य सुविधा यासंदर्भात कोणताही त्रास होणार नाही यासाठी विशेष काळजी घ्यावी, अशी सूचना पवार यांनी केली असल्याचे देसडला यांनी सांगितले.
व्यंगचित्रांतून लक्ष्मण यांना श्रद्धांजली
घुमान साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीतर्फे ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांना रविवारी (१ फेब्रुवारी) श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. शि. द. फडणीस, मंगेश तेंडुलकर, चारुहास पंडित, खलील खान, बापू घावरे, विश्वास सरूयवशी, वैजनाथ दुलंगे, घनश्याम देशमुख आणि सागर पवार हे कलाकार व्यंगचित्र चितारून लक्ष्मण यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. संभाजी उद्यान येथे सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होणार असल्याचे भारत देसडला यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा