लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : ‘महापालिकेच्या हद्दीतून वगळून राज्य सरकारने उरळी आणि फुरसुंगी या दोन गावांमध्ये नगर परिषद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या दोन्ही गावांसाठी पुणे महापालिकेने नगररचना योजना (टीपी) केली होती. ही योजना राबविण्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून पुणे महापालिकेलाच नियुक्त करण्यात यावे,’ अशी मागणी भाजपचे प्रदेश संयोजक नगरविकास प्रकोष्ट उज्ज्वल केसकर यांनी केली आहे.
राज्याचे नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले असून नगरविकास विभागाचे मंत्री म्हणून गावात निर्णय घ्यावा, अशी मागणी शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. चार वर्षांपूर्वी २०२१ मध्ये महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांसाठी राज्य सरकारने ‘पीएमआरडीए’ला विशेष प्राधिकरण म्हणून नियुक्त केले होते.यानंतर पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील ११७ गावांसाठी राज्य सरकारने आता रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे. फुरसुंगी, उरुळी गावांसाठी तीन नगररचना योजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत.
राज्य सरकारने या गावांना महापालिकेच्या हद्दीतून वगळण्याचा निर्णय घेतल्याने या गावातील प्रस्तावित नगर रचना योजनांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने पीएमआरडीए आणि एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली, तशीच नेमणूक उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावांसाठी पुणे महापालिकेची करावी.
राज्य सरकारने नगर विकास योजना राबविण्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून पुणे महापालिकेची नेमणूक केल्यास या योजनांची कामे मार्गी लागण्यास निश्चित मदत होईल, असेही केसकर यांनी नगरविकास मंत्री शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.