हिमालयात अत्युच्च ठिकाणी केल्या जाणाऱ्या लष्करी मोहिमांमध्ये वातावरणाशी जुळवून घेता न येणे अनेक जवानांच्या जिवावर बेतले आहे. मात्र हा धोका आता एका साध्या रक्त चाचणीद्वारे टाळता येऊ शकणार आहे. एखादी व्यक्ती अत्युच्च ठिकाणच्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकेल का, याची माहिती सांगणाऱ्या रक्त चाचणीवर ‘डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिओलॉजी अँड अलाईड सायन्स’ तर्फे (डायपास) संशोधन सुरू आहे. ही चाचणी यशस्वी ठरली तर ती जवान आणि गिर्यारोहकांचे प्राण वाचविणारी ठरेल. डायपासच्या विशेष कार्य अधिकारी कर्नल जी. हिमश्री यांनी ही माहिती दिली आहे.
सध्या जवानांच्या ‘हायपॉक्सिक व्हेंटिलेटरी रिस्पॉन्स’ या चाचणीद्वारे त्यांचा श्वासोच्छवास आणि हृदयाच्या ठोक्यांमधील बदल तपासला जातो आणि या चाचणीच्या निष्कर्षांवरून अत्युच्च ठिकाणी त्यांचे शरीर कसा प्रतिसाद देईल याचा अंदाज बांधला जातो. गिर्यारोहक हा प्रतिसाद लहान उंचीच्या गिर्यारोहण मोहिमांच्या अनुभवांतून आजमावतात. हाच अंदाज साध्या रक्त चाचणीद्वारे बांधणे शक्य झाले तर हिमालयात आव्हानात्मक मोहिमा करण्यापूर्वी कोणत्या जवानाने किती उंचीपर्यंत चढाई करणे सुरक्षित आहे, हे आधी कळू शकेल. ‘मॉलेक्युलर मार्कर्स फॉर हाय अल्टिटय़ूड ससेप्टिबिलिटी’ असे या संशोधनाचे शीर्षक आहे.
कर्नल हिमश्री म्हणाल्या, ‘‘जवानांना अत्युच्च वातावरणाशी जुळवून घेणे सोपे जावे यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपायांवर अभ्यास सुरू आहे. चढाई सुरू करण्यापूर्वी त्यांना ऑक्सिजनची कमतरता असणाऱ्या चेंबरमध्ये दररोज ठराविक काळासाठी ठेवले जाते. यामुळे चढाई करताना विरळ होत जाणाऱ्या ऑक्सिजनमध्ये राहणे त्यांना सोपे जाते. हवेतील ऑक्सिजन विरळ झाला की तो मिळविण्यासाठी श्वासोच्छवास वेगाने केला जातो. यात शरीरातील कार्बन डायऑक्साइड बाहेर फेकला जाऊन ‘हायपोकॅप्निक अल्कॅलोसिस’ ची स्थिती निर्माण होते. या स्थितीत श्वास घ्यायला त्रास होणे, डोकेदुखी, निद्रानाश अशी लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे कमी करण्यासाठी जवानांना ‘डायमॉक्स’ हे औषध सुचविले जाते. उंच ठिकाणी पोहोचल्यावर जवानांना अधिक ऑक्सिजन पुरवला जातो. यामुळे शरीराचे चलनवलन सामान्य होण्यास मदत होते.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा