पुणे : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाचा शुक्रवारी चौथा दिवस होता. या संपात आता एमबीबीएस पदवीच्या अंतर्वासित विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला आहे. यामुळे ससून सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवेला मोठा फटका बसला आहे. रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांची संख्या कमी होण्यासोबत शस्त्रक्रियांची संख्याही कमी झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोलकत्यातील वैद्यकीय महाविद्यालयात निवासी महिला डॉक्टरचा बलात्कार करून खून करण्यात आला होता. या घटनेनंतर डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. संपाचा शुक्रवारी चौथा दिवस होता. या संपात बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी सहभाग घेतला आहे. याचबरोबर शहरातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरही सहभागी झाले आहेत. यामुळे एकूणच वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न सर्व रुग्णालयांत रुग्णसेवेला मोठा फटका बसू लागला आहे.

हेही वाचा >>> वारजे भागातील खाणीत बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

ससून रुग्णालयात ५६६ निवासी डॉक्टर आहेत. त्यांपैकी १८० डॉक्टर अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत असून, उरलेले संपावर आहेत. आता एमबीबीएसच्या २५० अंतर्वासित विद्यार्थ्यांनी संपात सहभाग घेतला आहे. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवर गंभीर परिणाम झाला आहे. बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसंख्या कमी झालेली आहे. याच वेळी रुग्णालयातील शस्त्रक्रियांची संख्याही कमी झाली आहे.

शैक्षणिक कामकाजावर परिणाम

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी संपात सहभाग घेतला आहे. त्यामुळे ससून रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मदतीने रुग्णसेवा सुरू ठेवण्याची कसरत महाविद्यालय प्रशासनाला करावी लागत आहे. याचा परिणाम होऊन महाविद्यालयातील शैक्षणिक कामकाज सध्या ठप्प झाले आहे.

संपात सहभाग

एकूण निवासी डॉक्टर – ५६६

संपात सहभागी निवासी डॉक्टर – ३८६

संपात सहभागी एमबीबीएस अंतर्वासित – २५०

ससूनमधील रुग्णसेवा

तारीख – मोठ्या शस्त्रक्रिया – छोट्या शस्त्रक्रिया

१३ ऑगस्ट – ४२ – ६६

१४ ऑगस्ट – ३१ – ८०

१६ ऑगस्ट (दुपारी २ पर्यंत) – २१ – ३३

निवासी डॉक्टरांच्या संपामुळे बाह्यरुग्ण विभागासह इतर सेवांवर परिणाम झाला आहे. अत्यावश्यक विभागातील सेवा सुरळीतपणे सुरू आहे. याचबरोबर अत्यावश्यक शस्त्रक्रियाही व्यवस्थितपणे सुरू आहेत. रुग्णसेवेसाठी महाविद्यालयातील शिक्षकांची मदत घेतली जात आहे. – डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालय

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Resident doctors strike hits patient care surgery postpone pune print news stj 05 zws