पुलाचे काम करताना जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया

पुणे : लष्कर जलकेंद्रातून कोरेगाव पार्क परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी मंगळवारी पहाटे फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. पहाटे साधू वासवानी पुलाच्या कामासाठी जेसीबीने खोदाई करताना ही जलवाहिनी अचानक फुटली. फुटलेल्या जलवाहिनीचा शोध घेण्यास उशीर झाल्याने कोरेगाव पार्क भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे स्टेशन भागात असलेल्या साधू वासवानी उड्डाणपुलाचे काम पालिकेच्या वतीने केले जात आहे. हे काम सुरू असताना मंगळवारी पहाटे जलवाहिनी फुटली. ही माहिती तातडीने स्थानिक नागरिकांनी महापालिकेला कळविली. त्यानंतरदेखील दुपारी दोन वाजता पालिकेकडून या फुटलेल्या जलवाहिनीचा शोध घेण्यास सुरुवात केली. यामुळे कोरेगाव पार्क परिसरातील साऊथ मेन रोड आणि नॉर्थ मेन रोडच्या दोन्ही बाजूचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा >>> बाजार समितीतील ‘सेस’ कायम, राज्य सरकारकडून १२ तासांत अध्यादेश मागे

कोरेगाव पार्क परिसराला लष्कर जलकेंद्रातून आलेल्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पहाटे या जलवाहिनीतून कमी प्रमाणात पाणी असल्याने त्याची तीव्रता कमी होती. मात्र, सकाळी पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर येण्यास सुरुवात झाली. या वेळी जेसीबीने खड्ड्यातून पाणी काढण्याचे काम सुरू होते. या प्रकाराची माहिती महापालिकेस देण्यात आली. त्यामुळे पालिकेकडून तत्काळ या भागाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. मात्र, त्यानंतरही मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने महापालिकेस जलवाहिनी शोधण्यात अडचण येत होती. अखेर दुपारी जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. ते रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

हेही वाचा >>> असुरक्षित टेकड्या; भयभीत पुणेकर

या कामामुळे मंगळवारी या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. आज (बुधवारी) सकाळी कोरेगाव भागातील काही ठिकाणी उशीरा आणि कमी दाबाने पाणी मिळत असल्याच्या तक्रारी या भागातील नागरिकांनी केल्या आहेत. उच्चवर्गीय लोकवस्तीचा भाग अशी ओळख कोरेगाव पार्क परिसराची आहे. अनेक मोठ्या सोसायट्या, बंगले या भागात आहेत. नामांकित कंपन्यांची कार्यालय देखील याबाबत असल्याने हा पाणीबंद चा फटका त्यांनाही बसला असल्याची माहिती समोर आली.

संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद

पुणे शहराला पणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला जॅकवेल, नवीन, जुने पर्वती जलशुध्दीकरण केंद्र, लष्कर, वडगाव, वारजे, एसएनडीटी जलशुद्धीकरण केंद्र तसेच भामा आसखेड प्रकल्प अंतर्गत पाणी पुरवठा होणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत विषयक तसेच देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या कामामुळे संपूर्ण पुणे शहर तसेच उपनगरांचा पाणीपुरवठा उद्या गुरुवारी (१७ ऑक्टोबरला) पूर्ण दिवस बंद राहणार आहे.

या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (१८ ऑक्टोबरला) उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे. जलशद्धीकरण केंद्रातील कामे एका दिवसातच पूर्ण करण्याचा प्रयत्न पालिकेचा असल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असताना शहरातील विविध भागातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे पुणेकरांना हक्काच्या पाण्यापासून आजही वंचित राहावे लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Residents in koregaon park area suffer from shortage of water pune print news ccm 82 zws