लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पक्ष्यांना तसेच पारव्यांना उघड्यावर खायला घालू नये, यासाठी महापालिकेकडून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. जे नागरिक रस्त्यांवर पारव्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी धान्य टाकताना आढळतील त्यांच्यावर पालिकेचा आरोग्य विभाग दंडात्मक कारवाई करतो. मात्र पालिकेच्या पथ विभागाला याचा विसर पडला आहे. रस्त्याच्या सुशोभीकरण करण्याच्या निमित्ताने बिबवेवाडी येथील स्वामी विवेकानंद रस्त्यावरील डॉल्फिन चौकात चक्क पक्ष्यांना खाद्य टाकण्यासाठीची व्यवस्था निर्माण केली आहे.
महापालिकेने केलेल्या या व्यवस्थेमुळे या परिसरातील पक्षिप्रेमी येथे दररोज मोठ्या संख्येने धान्य टाकतात. हे धान्य खाण्यासाठी मोठ्या संख्येने या भागात पारवे येत असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांसह येथे राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेच्या पथ विभागाने पक्ष्यांना धान्य टाकण्यासाठी रस्त्याच्या दुभाजकावर ही जागा तयार करून दिल्याचा आरोप या भागातील नागरिकांकडून केला जात आहे. या समस्येबाबत बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर हे काम पालिकेच्या मुख्य खात्याकडून झाले आहे असे उत्तर दिले जाते. तर मुख्य खात्याकडे पाठपुरावा केल्यानंतर हे काम ट्रॅफिक आयलंड म्हणून तयार करण्यात आले असल्याने तेथे दुभाजक नाही. तसेच संबंधित जागा पादचाऱ्यांसाठी विश्रांती क्षेत्र असून त्याचा वापर विश्रांती घेण्यासाठी केला जात असल्याचा अजब दावा महापालिकेच्या मुख्य खात्याकडून करण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे आता दाद मागायची तर कोणाकडे असा प्रश्न या भागातील रहिवाशांना पडला आहे.
पारव्यांमुळेच श्वसनाचे अनेक आजार बळावत असल्याचे समोर आले आहे. पारव्यांची विष्ठा तसेच इतर घातक गोष्टींमुळे हायपर सेन्सेटिव्ह न्यूमोनिया, दमा, असे फुफ्फुसांशी संबंधित आजार होत असल्याचे डॉक्टरांनी केलेल्या पाहणीमध्ये समोर आले आहे. पक्ष्यांना खाऊ घातले की पुण्य मिळते अशी भावना नागरिकांच्या मनात असल्याने शहरातील विविध भागांमध्ये मोकळ्या जागांवर पक्ष्यांना खाण्यासाठी धान्य टाकले जाते. पक्ष्यांना उघड्यावर खायला घालू नये, अशा सूचना पुणे महापालिकेने केलेल्या आहेत. याकडे दुर्लक्ष करून उघड्यावर पक्ष्यांना धान्य टाकणाऱ्या नागरिकांवर पालिकेकचा आरोग्य विभाग कारवाई देखील करतो. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत देखील यावर अनेकदा जोरदार चर्चा झालेली आहे.
आणखी वाचा-आचारसंहिता जाहीर होताच महापालिकेत धावपळ, नक्की काय आहे कारण?
गेल्या काही वर्षांपासून बिबवेवाडी रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत मुख्य रस्ता तसेच विविध प्रकारच्या सुविधा नव्याने निर्माण केल्या जात आहेत. या रस्त्यावरील दुभाजक (डिव्हायडर) एक समान उंचीचे केले जात आहे. परंतु हे सुशोभीकरण करताना डॉल्फिन चौकात यापूर्वी जशी उंची ठेवली होती, तीच कायम केली आहे. रस्त्याच्या या दुभाजकावर पारव्यांना पक्षिप्रेमी नागरिकांकडून खाद्य टाकण्यात येते. त्यामुळे सकाळी येथे पारव्यांचे थवे बसलेले असतात. बाजूनेच वाहने जात असल्यामुळे अचानकपणे हवेमध्येच उडतात आणि त्याचा त्रास वाहनचालकांना आणि रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांना होतो. या रस्त्यावरील दुभाजक एकसमान उंचीचे असताना फक्त डॉल्फिन चौक येथे नुकताच ३० मीटर अंतराचा दुभाजक मात्र अगदी कमी म्हणजेच फूटपाथ एवढ्या उंचीचा ठेवण्यात आला आहे.
या दुभाजकाबाबत पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रारी केल्या नंतर हे काम मुख्य खात्याकडून होत आहे, असे उत्तर मिळते. तर मुख्य खात्याकडे विचारणा केल्यानंतर येथे ट्रॅफिक आयलंड म्हणून तयार करण्यात आले आहे. येथे दुभाजक नाही. तसेच या जागेचा वापर पादचाऱ्यांसाठी विश्रांती क्षेत्र म्हणून केला जात असल्याचे अजब स्पष्टीकरण दिले जाते, असा आरोप या भागातील रहिवाशांकडून केला जात आहे. एका बाजूला पक्ष्यांना उघड्यावर धान्य टाकण्यासाठी मज्जाव करणाऱ्या पालिकेचा दुसरा विभाग अशा पद्धतीने धान्य टाकण्याची जागा उपलब्ध करून देत आहे. यामुळे नागरिकांचे आणि आजूबाजूच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची ओरड स्थानिक नागरिकांकडून होत आहे. येथे येणाऱ्या पारव्यांमुळे अपघात होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. या भागातील स्थानिकांचे आरोग्य चांगले राहावे आणि अपघात टाळण्यासाठी इतर दुभाजकांप्रमाणे या चौकातील दुभाजक त्याच उंचीचा करून पारव्यांच्या त्रासापासून नागरिकांना वाचवावे, अशी मागणी केली जात आहे.
आणखी वाचा-पिस्तुलांची तस्करी रोखण्याचे आव्हान
पारव्यांची पिसे आणि विष्ठेमधून अनेक आजार बळावत असल्याचे समोर आले आहे. रुग्णाचे फुफ्फुस आकुंचन पावणे, बोलताना दम लागणे असे आजार पारव्यांच्या विष्ठेतून होतात. आणि दुसरीकडे पालिकेचा पथ विभाग दुभाजकावर या पक्ष्यांना धान्य टाकण्याची तसेच पाणी पिण्याची व्यवस्था निर्माण करून महापालिकाच नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. -अमित उरसळ, स्थानिक नागरिक
बिबवेवाडी येथील डॉल्फिन चौकातील दुभाजकाची उंची कमी असल्याने तेथे काही नागरिकांकडून पक्ष्यांना धान्य टाकले जाते. त्यामुळे पारवे मोठ्या संख्येने जमा होतात. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. येथील दुभाजकाची उंची वाढवून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे. -सुशील मोहिते, कनिष्ठ अभियंता, पुणे महापालिका
आणखी वाचा-खराब हवामानामुळे पुणेकर बेजार! आरोग्यतज्ज्ञांचा काळजी घेण्याचा सल्ला
कमानीचे काम अनेक वर्षे प्रलंबित
गणेशखिंड रस्त्यावरून कस्तुरबा वसाहतीच्या रिक्षा स्टॅन्डजवळून आत जाताना कमानीचे काम गेली अनेक वर्षे अर्धवट पडलेले आहे. काँक्रीट कॉलम अर्धवट असल्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. या भागातील नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे. वाहतुकीला अडथळा होईल असे दुकानाचे सामान रस्त्यावर ठेवलेले असते. हा रस्ता कस्तुरबा वसाहतीकडून इंदिरा वसाहतीमधून नीलगिरी लेनमध्ये अभिमान श्री चौकाकडे निघतो. मात्र नागरिकांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्ता बंद आहे. येथून रस्ता चालू झाल्यास नियोजित मेट्रोच्या स्टेशनकडे जायला सोपे होईल. पालिकेच्या अनेक विभागांकडे तक्रार करून देखील प्रत्येक विभाग एकमेकांकडे हात दाखवित आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतो. -राहुल वाघेरे