पुणे : प्रदीर्घ कालावधीनंतर आता कुठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे, असे म्हणत राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. आज मुंबईत ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमादरम्यान त्यांनी हा निर्णय जाहीर केला. त्यांचा निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विरोध होत असून, त्यांच्याकडून राजीनामे देण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यातदेखील शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत असल्याचे जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पुण्यात रामदास आठवले यांनी काढली कार्यकर्त्यांची अक्कल; म्हणाले, “यांना चांगलं ट्रेनिंग द्या…”

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयाजवळ पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रित आले. यावेळी शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील म्हणाल्या की, देशाच्या राजकारणात शरद पवार हे सर्वोच्च स्थानी आहेत. शरद पवार हे सत्तेमध्ये असो अथवा नसो, त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी सर्व पक्षातील नेते त्यांना भेटत असतात. पण आज अचानकपणे शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आमच्या सर्वासाठी धक्कादायक आहे. निवृत्त होण्याचा निर्णय साहेबांनी मागे घ्यावा, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा – पुणे : प्रियकराच्या त्रासामुळे युवतीची आत्महत्या, प्रियकरासह दोघांच्या विरुद्ध गुन्हा

शरद पवार यांनी आम्हाला कायम मार्गदर्शन करीत राहावे. हीच मागणी देशातील सर्व कार्यकर्त्यांची आहे. जोपर्यंत शरद पवार अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत नाही. तोपर्यंत आम्ही आमची मागणी करीत राहणार असून, आम्ही सर्वजण आमच्यापदाचा राजीनामा देत असल्याचेही त्या म्हणाल्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Resignation of all office bearers including pune city ncp president prashant jagtap demand for sharad pawar to withdraw his resignation svk 88 ssb
Show comments