पिंपरी : काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे यांनी प्रदेश सचिवपदासह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. साठे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. चिंचवड मतदारसंघातील पिंपळेनिलख भागातील साठे यांनी पोटनिवडणुकीच्या धामधुमीत राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या २६ वर्षांपासून निष्ठेने काँग्रेस पक्षाचे काम करत आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून पक्षीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर घुसमट होत आहे. पक्षाच्या व्यासपीठावर वेळोवेळी अनेक मुद्दे मांडले, त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. शहर पातळीवरील पक्षहितासाठी अनेक विषय उपस्थित केले, त्याचीही दखल घेतली गेली नाही. पक्षाकडून अशाप्रकारे होणारी उपेक्षा सहन करू शकत नाही. अशा परिस्थितीत यापुढे पक्षात थांबणे योग्य नाही, अशी भावना झाल्याने स्वखुशीने राजीनामा दिला असल्याचे साठे यांनी सांगितले.
साठे यांनी एनएसयूआयचा जिल्हाध्यक्ष, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, २०१४ ते २०२० या साडेसहा वर्षांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्षपद भूषवले. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचा निरीक्षक म्हणूनही काम केले आहे.