राष्ट्रवादी काँग्रेसने कमी महत्त्वाच्या समितीवर संधी दिल्याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिलीप बराटे आणि शंकर उर्फ बंडू केमसे यांनी विधी समितीच्या सदस्यत्वाचा बुधवारी राजीनामा दिला. या दोघांची दोनच दिवसांपूर्वी या समितीवर नियुक्ती झाली होती.
महापालिकेतील चार समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. प्रत्येक समितीमध्ये तेरा सदस्य असून राष्ट्रवादीचे पाच सदस्य प्रत्येक समितीमध्ये निवडले गेले आहेत. त्यातील विधी समितीमध्ये बराटे आणि केमसे यांना पक्षाने पाठवले होते. मात्र, कमी महत्त्व असलेली समिती पक्षाने दिल्यामुळे या दोघांनी त्यांच्या समिती सदस्यत्वाचा राजीनामा बुधवारी महापौर वैशाली बनकर आणि सभागृहनेता सुभाष जगताप यांच्याकडे दिला.
दिलीप बराटे यापूर्वी उपमहापौर होते. त्यांचे नाव या वेळी स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. केमसे यांनाही स्थायी समितीचे सदस्यत्व मिळण्याची चर्चा होती. मात्र, स्थायी वा शहर सुधारणा समितीमध्ये या दोघांना संधी देण्यात आली नाही. या दोन्ही समित्यांनंतर ज्या समितीचे महत्त्व आहे, अशा विधी समितीमध्ये त्यांना पक्षाने पाठवल्यामुळे दोघांनी राजीनामे दिले आहेत. पक्षाने या समितीवर नव्या नगरसेवकांना संधी द्यावी, असे या दोघांनी पक्षाला कळवले आहे.