मावळ लोकसभेच्या रिंगणात महायुतीशी स्वतंत्रपणे लढत देणाऱ्या आमदार लक्ष्मण जगताप यांना मनसेने पाठिंबा दिल्याबद्दल जगतापांनी गुरुवारी मुंबईत जाऊन राज ठाकरे यांचे आभार मानले. दरम्यान, जगताप यांनी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अनधिकृत बांधकामांचा एवढाच कळवळा असेल तर जगतापांनी राजीनामा द्यावा, अशी टीका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.
मावळच्या रंगतदार लढतीत शेकाप व मनसेने जगतापांना पाठिंबा दिला आहे. मनसेने स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणात न उतरवता जगतापांना पाठिंबा दिला. त्यामुळे जगतापांचे बळ वाढले आहे. गुरुवारी जगतापांनी राज ठाकरे यांची भेट घेतली व त्यांचे आभार मानले. यावेळी उमेश चांदगुडे, नृपाल पाटील, बाबा जाधवराव, रमेश कदम आदी उपस्थित होते. मावळसाठी आपण वैयक्तिक लक्ष घालू आणि दोन जाहीर सभा देऊ, अशी ग्वाही दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, राज यांच्या भेटीनंतर जगतापांनी विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा दिला.

Story img Loader