करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि खासगी रुग्णालयांसाठी देखील अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा) लागू केल्याच्या पाश्र्वभूमीवर खासगी रुग्णालयांमधील परिचारिका काम सोडून जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच अडचण झाली असून परिचारिकांच्या संघटनांबरोबर चर्चा करून काम न सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
करोनाच्या सद्य:स्थितीबाबत दूरचित्रसंवादाद्वारे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. राज्य सरकारच्या आदेशानुसार ज्या खासगी रुग्णालयांमध्ये १०० पेक्षा जास्त खाटा आहेत, त्या रुग्णालयांमधील एकूण खाटांपैकी ८० टक्के खाटा शासकीय नियंत्रणाखाली घेण्यात येणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी खासगी रुग्णालय प्रशासनासोबत बैठकही घेतली होती. त्यामध्ये रुग्णालयांनी परिचारिका काम सोडून जात असल्याचे सांगितले होते. दरम्यान, करोनाचा वाढता प्रादुर्भाव, वैयक्तिक सुरक्षा उपकरणांची कमतरता अशा कारणांमुळे शहरातील खासगी रुग्णालयांमधून ५० टक्के परिचारिकांनी काम सोडून त्या मूळ गावी परतल्या आहेत किंवा परतत आहेत.
या पाश्र्वभूमीवर डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘खासगी रुग्णालयांमधून परिचारिका काम सोडून जात असल्याचे खरे आहे. मात्र, त्यांनी काम सोडून जाऊ नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसेच करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांमध्ये परिचारिकांना वैयक्तिक सुरक्षा उपकरणे (पीपीई कीट) पुरवली जातील. रुग्णालयांमधील बहुतांश परिचारिका केरळ राज्यातील असल्याने यासंदर्भात परिचारिकांच्या मल्याळी संघटनांसोबत बोलणी सुरू आहेत. तसेच मध्यपूर्व देशांमधून अनेक भारतीय परिचारिका केरळमध्ये परतत आहेत. या परिचारिकांना वैद्यकीय सेवेसाठी पुण्यात आणण्याबाबतही प्रयत्न केले जात आहेत’.