पुणे : पुण्याच्या पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित करण्यात आलेल्या सात गावांमधील ग्रामपंचायतींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी निवेदन दिले. प्रकल्पाला जमिनी देण्यास विरोध असून याबाबतचे ठराव ग्रामपंचायतींकडून पारित करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Maharashtra News Live : राज्यातील सत्तासंघर्षावर आजही निर्णय नाहीच; महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

हेही वाचा : दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी वाहतूक पोलीस, वॉर्डन गजाआड

पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळा कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस आले होते. त्यावेळी त्यांना सातही ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींनी निवेदन देऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी, वनपुरी, एखतपूर आणि कुंभारवळण सात या गावांतील सात हजार एकरपेक्षा जास्त जागा आहे. ही गावे पुरंदर उपसा सिंचन योजनेतील लाभार्थी आहेत. बागायती जमिनी असून उदरनिर्वाहाचे शेती हेच साधन असल्याने त्या देण्यास विरोध असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या सातही गावांनी ग्रामसभेमध्ये ठराव करून विमानतळ प्रकल्पासाठी जमिनी न देण्याचा ठराव संमत केला आहे.

याबाबत पारगावचे बापू मेमाणे म्हणाले, ‘पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस बुधवारी आले होते. त्यामुळे विमानतळ प्रस्तावित करण्यात आलेल्या सातही गावांतील ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्रित येऊन निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीसांनी उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू दिले नाही. त्यामुळे अखेर दोन प्रतिनिधींनी जाऊन निवेदन दिले. कोणत्याही परिस्थितीत विमानतळासाठी जमिनी देणार नसून त्याबाबतचे ठरावही संमत करण्यात आले आहेत.’

दरम्यान, भूसंपादन करण्यापूर्वी स्थानिकांशी चर्चा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांना देण्यात आल्या आहेत. तसेच भूसंपादन प्रक्रियेपूर्वीची कार्यवाही करण्याचे आदेशही महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला (एमएडीसी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे एकीकडे विमानतळ प्रकल्पाला गती मिळत असताना दुसरीकडे प्रकल्प प्रस्तावित केलेल्या सातही गावांमधील नागरिक आक्रमक झाले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Resolution seven gram panchayats land purandar airport statement fadnavis pune print news ysh