पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील ८६५ गावांतील सुमारे २५ ते ३० लाख मराठी भाषक गेली ६८ वर्षे  महाराष्ट्रात येण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असून हा वादग्रस्त सीमा भाग महाराष्ट्रात सामील करण्यासंदर्भातील ठराव दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये संमत करण्याची मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेळगाव येथे १९२८, १९४६ आणि २००० मध्ये अशा तीन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन झाले होते. गेली अनेक वर्षे साहित्य संमेलनामध्ये ‘वादग्रस्त सीमा भाग महाराष्ट्रात सामील करण्यात यावा’, असे ठराव संमत होतात. १९५९ मध्ये दिल्ली येथे झालेल्या साहित्य संमेलनामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा ठराव झाला होता. आता पुन्हा दिल्ली येथे होणाऱ्या संमेलनात याविषयीचा ठराव संमत करण्याची मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केली आहे. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.

प्रलंबित सीमा प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र शासनाने २९ मार्च २००४ रोजी सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. हा विषय विधीमंडळात किंवा संसदेत चर्चेला येतो त्यावेळी ही बाब न्यायप्रविष्य असून न्यायालयातील निर्णयानुसार पुढील कार्यवाही होईल, इतकेच उत्तर मिळते. त्याचवेळी ईशान्य भारतातील अनेक राज्यामधील वाद न्यायप्रविष्ट असतानाही केंद्र सरकार पुढाकार घेऊन तो वाद सोडवत आहे, याकडे पत्राद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे.

‘आम्ही मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धनाचा प्रामणिक प्रयत्न करीत आहोत. मात्र, कर्नाटक सरकारच्या गळचेपीमुळे बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील भाषा आणि स्ंस्कृती नष्ट होण्याची भीती वाटत आहे. तेथील शासनाकडून लोकशाही आणि राज्यघटनेच्या सर्व तरतुदींचे उल्लंघन केले जात आहे. आमचा कन्नड भाषेला विरोध नाही. पण, २५ ते ३० लाख मराठी जनतेला आमच्या मातृभाषेपासून वंचित ठेवले जात आहे, अशी व्यथा समितीने मांडली आहे.

सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र साहित्य परिषद नेहमीच खंबीरपणे उभी राहिली आहे. हा ठराव संमेलनात मांडला जावा यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद आग्रही भूमिका घेईल. – प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद