पिंपरी: परंपरा आणि संस्कृतीला अनुरूप राहतानाच गणेशभक्तांच्या भावनांचा आदर करून त्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवात सहभागी करून घेतले पाहिजे, असे मत पिंपरी पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी बैठकीत व्यक्त केले.
शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, या हेतूने काही स्वयंसेवी संस्था दरवर्षी काम करतात. अशा स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत पालिका व पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक पालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात पार पडली, तेव्हा आयुक्त बोलत होते. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर, आनंद भोईटे, शहर अभियंता मकरंद निकम यांच्यासह डॉ. मोहन गायकवाड, अशोक तनपुरे, प्रभाकर नेरुकर, वृंदा शेटे, विनिता दाते, सिकंदर घोडके, अनिल दिवाकर, सुर्यकांत मुथियान, उमेश वाघेला, स्वप्नील कुलकर्णी आदी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हेही वाचा >>> मेट्रो पुलामुळे विसर्जन मिरवणुकीतील रथांच्या उंचीवर मर्यादा ; रथांची उंची कमी ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन
शेखर सिंह म्हणाले, गणेश विसर्जनावेळी पर्यावरण प्रेमी संस्थांच्या स्वयंसेवकांनी संरचनात्मक नियोजनावर भर द्यावा. प्रशासकीय यंत्रणांशी समन्वय ठेवावा. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतल्यास त्यातून पर्यावरण चळवळीला अधिक चालना मिळू शकेल.
पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर म्हणाले, गणेशभक्तांच्या भावना न दुखावता पर्यावरणप्रेमी स्वयंसेवकांनी गणेशोत्सवात आपले कार्य करावे. हा उत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासोबत शांततापूर्व वातावरणात पार पाडण्याचा पोलीस प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.
‘निर्माल्य कुंड कायमस्वरूपी ठेवावेत’
नागरिकांनी शाडूच्या मातीपासून बनवलेले गणेशमूर्तींचे घरीच विसर्जन करून जमा झालेली माती स्वयंसेवी संस्थांकडे जमा करावी. विसर्जनाच्या ठिकाणी मूर्तीदान करावे. ‘शून्य कचरा’ उपक्रम राबवण्यासाठी गणेश मंडळानी पुढाकार घ्यावा. नैसर्गिक मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तीचा वापर करावा. निर्माल्य कुंड गणेशोत्सवापुरतेच मर्यादित न ठेवता ते कायमस्वरूपी ठेवावेत, अशा विविध सूचना सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत केल्या.