पुणे : गेल्या चार – पाच दिवसांपासून मुंबईसह किनारपट्टीवर आणि विदर्भात असलेला पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे. त्यामुळे पूरजन्य स्थितीचा सामना करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ओडिशाच्या किनारपट्टीवर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली असून, ते ओडिशा आणि लगतच्या छत्तीसगडवर आहे. गुजरातच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा कायम आहे. दक्षिणेकडे झुकलेला मोसमी पावसाचा आस पुन्हा उत्तरेकडे गेला आहे. प्रामुख्याने मोसमी पावसाचा (मान्सून ट्रफ) आस उत्तरेकडे सरकल्यामुळे आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाल्यामुळे पुढील चार दिवस विदर्भात पावसाचा जोर कमी राहणार आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते… अमित शाहांची टीका

गुजरातमधील कच्छ परिसरावर वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाल्यामुळे रविवारी ठाणे, पालघर, मुंबईत मुसळधार पाऊस पडला. रविवारी सायंकाळपासून कच्छमधील वाऱ्याची चक्रीय गती कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सोमवारी दुपारनंतर मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे.

मुंबई, कोकण, विदर्भाला झोडपले

रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता संपलेल्या नऊ तासांत सातांक्रुजमध्ये १४० मिमी, कुलाब्यात ४० मिमी, डहाणूत १३८ मिमी, रत्नागिरीत ६२ मिमी आणि महाबळेश्वरमध्ये १४१ मिमी, पावसाची नोंद झाली आहे. तर रविवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत दापोलीत २४० मिमी, मंडणगडमध्ये २४० मिमी, नागपूर विमानतळावर १६० मिमी, गडचिरोलीत १६८.६ मिमी, नागपूर १६४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा – पुणे: रिक्षांसह इतर तक्रारींसाठी आरटीओने हेल्पलाइन सुरू केली पण उत्साही नागरिकांमुळे वाढली डोकेदुखी…

सोमवारसाठी इशारा

नारंगी इशारा – रायगड, रत्नागिरी, सातारा, भंडारा.

पिवळा इशारा – सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर आणि विदर्भ.