चकली, लाडू, चिवडा, शंकरपाळी, करंजी, शेव, कडबोळी अशा रुचकर फराळावर ताव मारतानाच मनाची भूक भागविणाऱ्या दिवाळी अंकरूपी ‘अक्षर फराळा’लाही वाचकांकडून भरभरून प्रतिसाद लाभत आहे. पुस्तकांच्या दुकानांमध्ये दिवाळी अंकांसाठी स्वतंत्र दालने करण्यात आली असून आप्तेष्टांना भेट देण्यासाठी वाचक दिवाळी अंक खरेदी करीत आहेत. सध्या तीनशेहून अधिक दिवाळी अंक बाजारामध्ये उपलब्ध आहेत.
वाचनीय साहित्य, विषयांमधील वैविध्य आणि चालू घडामोडींवर भाष्य असलेला खुसखुशीत मजकूर हे दिवाळी अंकांचे वैशिष्टय़ असते. ज्योतिष-आरोग्य, पाककला असे एका विषयाला वाहिलेले अंक, बालकुमारांसाठी अंक, निव्वळ वाङ्मयीन असे विविध प्रकारचे दिवाळी अंक उपलब्ध असल्याने वाचकांना वेगवेगळे पर्याय मिळाले आहेत. ‘लोकसत्ता’, ‘मौज’, ‘मेनका’, ‘माहेर’, ‘अक्षर’, ‘उत्तम अनुवाद’, ‘अनुभव’, ‘अंतर्नाद’, ‘पुण्यभूषण’, ‘किस्त्रीम’, ‘मोहिनी’, ‘पद्मगंधा’, ‘साधना’ या दिवाळी अंकांना वाचकांकडून मोठी मागणी आहे. भेट देण्यासाठी दोनतीन प्रतींमध्ये अंकाची खरेदी केली जात असल्याची माहिती कोथरूड येथील शब्दनाद पुस्तक प्रदर्शनाचे विनायक धारणे यांनी दिली. दिवाळी अंकांचे खास दालन केल्यापासून दररोज किमान २५ हजार रुपये किमतीच्या दिवाळी अंकांची उलाढाल होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका दिवाळी अंकांना बसेल की काय अशी भीती सुरुवातीला वाटत होती. मात्र, दिवाळी सुरू होताच वाचकांची दिवाळी अंकांवर पडणारी उडी पाहता ही भीती निर्थक ठरली. त्याचप्रमाणे ई-दिवाळी अंकांच्या प्रभावामुळे मुद्रित अंकांना उठाव येईल की नाही ही शक्यता देखील फोल ठरली आहे. पुण्यातील साहित्यप्रेमी एक वेळ कपडेखरेदीमध्ये आखडता हात घेतील. पण, दिवाळी अंकांच्या खरेदीमध्ये कसूर करीत नाहीत, हा अनुभव यंदाही आम्हाला आला. अनेकांनी दिवाळी अंकांच्या खरेदीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद केलेली असते. गेल्या आठ दिवसांमध्ये वेगवेगळ्या दिवाळी अंकांच्या साधारणपणे पाच हजार प्रतींची विक्री झाली आहे. एका अंकाची किंमत सरासरी शंभर रुपये धरली, तर ही उलाढाल पाच लाख रुपयांच्या घरात झाली आहे. दिवाळी संपल्यानंतर अनेकांची अक्षर फराळाची दिवाळी सुरू होत असल्याने दिवाळी अंकांची उलाढाल यंदा दहा लाखांच्याही पुढे जाईल, असा विश्वास वाटत असल्याचे अक्षरधारा बुक गॅलरीचे रमेश राठिवडेकर यांनी सांगितले.

Story img Loader