पिंपरी-चिंचवड महापालिकेत एलबीटीच्या नोंदणीला वाढता प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत साडेचार हजार व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आहे. येत्या २२ एप्रिलपासून एलबीटीच्या विरोधात पुन्हा बंद पुकारण्याची घोषणा करत व्यापाऱ्यांनी आजपासून मालखरेदी बंद करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण होऊ लागली आहे. रॅली, मोर्चाला परवानगी न देण्याची भूमिका घेत पोलीस उपायुक्तांनी सक्तीने दुकाने बंद केल्यास कारवाईचा इशाराही दिल्याने काही प्रमाणात का होईना नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
महापालिकेने १८ मार्चपासून एलबीटीची नोंदणी सुरू केली. सुरुवातीला थंड प्रतिसाद होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत असून आजमितीला साडचार हजार इतकी नोंदणी झाल्याचे सांगण्यात येते. शहरात जवळपास २५ हजार व्यापारी असल्याची नोंद पालिकेकडे आहे. या वेगाने नोंदणी सुरू राहिल्यास दहा दिवसात नोंदणीचे काम पूर्ण होईल, असा विश्वास एलबीटी विभागाचे प्रमुख अशोक मुंढे यांना वाटतो आहे. एलबीटीसाठी देण्यात आलेल्या हेल्पलाईनचा पाच हजाराहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे, असेही ते म्हणाले.
दुसरीकडे, २२ एप्रिलपासून बंद पुकारण्यात येणार असल्याने काही व्यापाऱ्यांनी आतापासूनच चढय़ा भावाने विक्री करण्यास सुरुवात केली आहे. बंद काळात कसे होणार, ही चिंता सामान्य नागरिकांप्रमाणेच हातावर पोट असणाऱ्यांना भेडसावते आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सक्तीने कोणाचेही दुकान बंद करता येणार नाही, अशी सक्त ताकीद पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी दिली असून तशा तक्रारी आल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.