पुणे : ‘एकेकाळी संरक्षण साहित्य आयात करणारा भारत आता निर्यातदार झाला आहे. देशात तरुण नवसंकल्पना विकसित करत आहेत. नवउद्यमी निर्माण होत आहेत. जागतिक स्पर्धेत टिकू शकणारी उत्पादने देशात तयार होत आहेत. येत्या काही वर्षांत ४२ टक्के कुशल मनुष्यबळ भारतीय असणार आहे. त्यामुळे देशाला विकसित करण्याची जबाबदारी तरुणांवर आहे,’ अशी भूमिका संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) माजी अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी मांडली.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सृजन यांच्यातर्फे आयोजित ‘डिपेक्स’ प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. रेड्डी यांच्या हस्ते गुरुवारी सीओईपीच्या सभागृहात झाले. त्या वेळी ते बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड, अभाविपचे राष्ट्रीय संघटनमंत्री आशिष चौहान, स्वागत समितीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश धोका, सृजनचे डॉ. राजेंद्र हिरेमठ, प्रसेनजित फडणवीस, अथर्व कुलकर्णी, संकल्प फळदेसाई या वेळी उपस्थित होते.

डॉ. रेड्डी म्हणाले, ‘देशात आता परिवर्तन होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये बदल होत आहे. नवसंकल्पना हा चर्चेतील शब्द आहे, तर शिक्षण संस्था नवसंकल्पनांचे इंजिन आहेत. पूर्वी देशात आयआयटी, आयआयएम, विद्यापीठे, अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या कमी होती. मात्र, आज जवळपास प्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठ आहे. प्रत्येक राज्यात आयआयटी, आयआयएम, आयसर आहे. १४ लाख अभियंते देशात दर वर्षी घडतात. आयआयटीत शिकून परदेशात जाणाऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे. ते भारतात राहून संशोधन, नवसंकल्पना विकसित करत आहेत. भारतात १ लाख ६२ हजार स्टार्ट अप देशात नोंदणीकृत आहेत. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत अशा योजनांमुळे भारतात उत्पादनाची चळवळ सुरू झाली आहे. भारतीय तरुणांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांमध्ये आंतरराष्ट्रीय संस्था गुंतवणूक करत आहेत. आता आपली उत्पादने जगात पोहोचली पाहिजेत. त्या दृष्टीने ‘डिपेक्स’सारखे उपक्रम महत्त्वाचे आहेत.’

‘‘डिपेक्स’मधून अनेक उत्पादने विकसित होऊन बाजारात आली. समाजाची गरज पूर्ण करू लागली. काजू उद्योगातील यांत्रिकीकरणाची सुरुवात ‘डिपेक्स’मधील प्रकल्पातून झाली. अनेक देशांची भारताकडून अपेक्षा आहे. जर्मनीने महाराष्ट्राकडे चार लाख तरुणांची मागणी केली आहे. मात्र, त्यांना प्रशिक्षित तरुण हवे आहेत. आपल्याला श्रीमंत होण्यासाठी शोध लावावे लागतील, त्याचा एकस्व अधिकार (पेटंट) मिळवावा लागेल, त्यातून शुल्क (रॉयल्टी) मिळवावे लागेल. ही बाब ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुणांना प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे जगात महिलांच्या स्टार्टअपमध्ये भारत प्रथम स्थानी, तर पुरुषांच्या स्टार्टअपमध्ये द्वितीय स्थानी आहे,’ असे पाटील यांनी नमूद केले.

डॉ. भिरूड म्हणाले, ‘पदविका विद्यार्थ्यांच्या प्रकल्पापेक्षा पदवीच्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प अधिक परिणामकारक असतात. कारण पदवीचे विद्यार्थी ‘सिम्युलेशन’ आधारित असतात. तर, पदविका विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष प्रकल्प असतात. आता कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे तंत्रज्ञान येत असताना ‘डिपेक्स’मधील विभागांचा विचार नव्याने करावा लागणार आहे. ‘डिपेक्स’च्या माध्यमातून अधिकाधिक लोकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांनी उद्योजक होण्याच्या दृष्टीने विचार करावा.’