लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना काँग्रेसने राज्यातील अन्य लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर, प्रदेश सरचिटणीस संजय बालुगडे आणि ॲड. अभय छाजेड, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी या चार इच्छुक उमेदवारांना अन्य लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर पुणे लोकसभेसाठी माजी राज्यमंत्री, आमदार विश्वजीत कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभेसाठी येत्या मार्च-एप्रिल महिन्यात निवडणूक होणार आहे. त्यासंदर्भातील आचारसंहिता फेब्रुवारी महिन्यात सुरू होईल, अशी शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसकडून निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पक्षाच्या केंद्रीय मंडळ आणि प्रदेश काँग्रेसकडून निरीक्षकांची नियुक्ती करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार पुण्यातील इच्छुक उमेदवारांना अन्य लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्याचा उमेदवार कोण, असा प्रश्नही उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.
आणखी वाचा-कात्रजमधील मैदानाचे आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात मविआचे पुणे महापालिकेत अनोखे आंदोलन
पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर, ॲड. अभय छाजेड, संजय बालगुडे आणि मोहन जोशी यांनी पक्षाकडे इच्छुक म्हणून नाव दिले आहे. मात्र धंगेकर यांना सातारा लोकसभा, छाजेड यांना हातकणंगले लोकसभा, संजय बालगुडे यांना माढा लोकसभा तर मोहन जोशी यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जबाबादीर देण्यात आली आहे. पुण्याची जबाबदारी माजी मंत्री, आमदार विश्वजीत कदम यांच्याकडे देण्यात आली आहे. मतदरासंघाची बांधणी करण्याची जबाबदारी या सर्वांना आहे. इच्छुक उमेदवारांना पुण्यापासून बाहेर ठेवल्याने आणि कदम यांना पुण्याची जबाबदारी दिल्याने कदम पुन्हा उमेदवार असणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.