लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : धनकवडीतील एका उपाहारगृहात रविवारी दुपारी सिलिंडरमधून गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी उपाहारगृह मालकाला अटक करण्यात आली. कामगाराच्या मृत्यू, तसेच निष्काळजीपणा दाखविल्याप्रकरणी उपाहारगृह मालकाविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे-सातारा रस्त्यावरील के. के. मार्केट परिसरातील हॉटेल साईबामध्ये रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास सिलिंडरमधून गळती होऊन आग लागली. आगीत उपाहारगृहातील कामगार संतोष श्रीसेन हेगडे (वय २६) याचा मृत्यू झाला. आग लागल्यानंतर शेजारी असलेल्या दोन दुकानांना झळ पोहोचली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आगीत दुकानातील फर्निचर, तसेच शेजारी असलेल्य दुकानांमधील माल जळाला.

दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. सायबा हॉटेलचे मालकाच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी उपाहारगृह मालक केशव श्रीमंत जाधव (वय २८, रा. साई निसर्ग सोसायटीच्या मागे, कात्रज-कोंढवा रस्ता) यांना अटक करण्यात आली. याबाबत प्रसाद केंची (वय ३०, रा. सुखसागरनगर, कात्रज) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण तपास करत आहेत.

कामाचा पहिला दिवस

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेला सायबा हॉटेलमधील कामगार संतोष हेगडे याचा कामाचा पहिला दिवस होता. कामाच्या पहिल्या दिवशी उपाहारगृहात सिलिंडरमधून गळती झाली. या घटनेत त्याचा मृत्यू झाल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात आली.