ज्यांना खादाडी आवडते त्यांच्यासाठी हे एक मस्त ठिकाण आहे. मराठी पदार्थाचं मराठीपण आणि त्यांची चव जपत इथे दिले जाणारे सर्वच पदार्थ मस्त या गटातले. त्यामुळेच खादाडीचा आनंद अनुभवण्यासाठी इथे जायला हवं. इथे जायचं एखादा पदार्थ खाऊन बाहेर पडायचं अस करण्यात काही गंमत नाही. इथे मस्त तिघा-चौघांनी किंवा आणखी मोठा ग्रुप घेऊन जावं आणि वेगवेगळे पदार्थ मागवत खादाडीचा आनंद घ्यावा.

काही शब्दच फार मस्त असतात नाही. ‘खादाडी’ हा असाच एक शब्द. खादाडीमध्ये निव्वळ खाण्याचा आनंद लुटणं एवढंच अपेक्षित असावं. उगाच पदार्थाची चिकित्सा वगैरे करणं खादाडी या प्रकारात अपेक्षित नाही. माझ्या मते फक्त खादाडी करा.. म्हणजे खादाडीचा आनंद घ्या, एवढाच या शब्दाचा अर्थ. या अर्थाची अनुभूती तुम्हाला घ्यायची असेल तर ‘खादाडी’ला पर्याय नाही. म्हणजे ‘खादाडी’चा अनुभव कुठे घ्यायचा असा प्रश्न असेल तर सरळ भरत नाटय़ मंदिरासमोर असलेल्या ‘खादाडी’मध्ये प्रवेश करा आणि आलटून-पालटून कोणतेही पदार्थ मागवा. खादाडीचा पुरेपूर आनंद तुम्हाला इथे मिळेल, यात शंकाच नाही

‘खादाडी’कारांच्या मते म्हणजे ‘खादाडी’ जे चालवतात त्या सचिन आणि श्रेया कोटस्थाने यांच्या मते खादाडी म्हणजे जिव्हातृप्ती. म्हणूनच इथल्या मेनू कार्डवरही तुम्हाला हाच शब्द प्रथमदर्शनी पाहायला मिळेल. चमचमीत पापड भाजी हा इथला एक मस्त प्रकार. मैद्याचा पापड आधी तयार करून घेतला जातो आणि मग बटाटा भाजी, चिंचेची चटणी, शेव, कांदा आदींचा वापर करून हा चमचमीत, चवीष्ट पापड तयार होतो. तुम्हाला खादाडीची सुरुवात त्याच्यापासून करता येईल. चमचमीत कटवडा, तिखटमिठाचा सांजा, साजुक तुपातील शिरा किंवा ब्रेड चिज मसाला हे आणखी काही जिव्हातृप्तीचे इथले प्रकार. शिवाय मिसळप्रेमींसाठी अगदी टिपिकल पद्धतीनं दिली जाणारी इथली मिसळ हाही खादाडीच्या आनंदाचा आणखी एक भाग. बटाटा भाजी, मटकी उसळ, शेव, फरसाण, रस्सा अशी साग्रसंगीत मिसळ इथे नक्की ट्राय करा. मिसळ म्हणजे वेगवेगळ्या पदार्थाचा एकत्रित आस्वाद. तसा प्रकार इथे आहे. मिक्स भजींची इथली प्लेट हा प्रकारही असाच. त्याची चव घेतली की तुम्हाला समजेल खादाडी म्हणजे काय. कांदा, बटाटा, पालक, कारलं, मूग, ओवा, घोसाळं, केळं, चीज, पनीर, मिरची अशी विविध प्रकारची भजी इथे मिळतातच. शिवाय दहा प्रकारच्या मिश्र भजींची इथली डिश हाही अनेकांनी मिळून एकत्र टेस्ट करण्याचा खाद्यप्रकार आहे. ब्रेड-लोणी-साखर अशीही डिश इथे आहे.

ज्यांना पूर्ण जेवण नको आहे; पण पोटभर खादाडी करायची आहे त्यांच्यासाठीही इथे विविध पर्याय आहेत. कुर्मा पुरी, बटाटा रस्सा पुरी, तवा पुलाव, पनीर पुलाव, ग्रीन पीज पुलाव असे पदार्थ इथे दिले जातात. शिवाय उपासाची कचोरी, खिचडी, उपासाचा रगडा पॅटीस हे उपासाचे पदार्थही वेगळे आणि वैशिष्टय़पूर्ण आहेत. अर्थात ‘खादाडी’ काही इथेच पूर्ण होऊ शकत नाही. इतरही खूप काही इथे आहेच. ते पदार्थ आहेत आपले पारंपरिक आणि मराठीपण जपणारे.

मराठी चवीची खास भाजणी आणि त्यापासून बनवलेलं थालिपीठ इथे दह्य़ाबरोबर किंवा लोण्याबरोबर मिळतं. शिवाय मिश्र डाळीच्या पिठांपासून तयार केले जाणारे धपाटे हे ‘खादाडी’चं खास वैशिष्टय़ं. नाश्त्यासाठी पोहे, साजूक तुपातला शिरा, आळूवडी, कोथिंबीर वडी असे अनेकविध आणि चवीष्ट पदार्थही खादाडीमध्ये अगदी गरमगरम देण्याची पद्धत आहे. ओपन किचन हे इथलं वैशिष्टय़. म्हणजे हॉटेलचा भटारखाना आपल्या समोर. तुम्ही जी ऑर्डर देता तो पदार्थ नक्की कसा तयार होत आहे हे तुम्ही पाहू शकता.

‘खादाडी’ सुरू करणारे सचिन कोटस्थाने यांचा या क्षेत्रातला वीस वर्षांचा अनुभव आहे. पिंपरीतील मासुळकर कॉलनीत आणि नंतर वडगाव जवळच्या सिंहगड कॉलेजजवळ त्यांनी फास्टफूड सेंटर चालवलं. शिवाय ते मेसही चालवत होते. पुढे माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये भोजन पुरवण्याचा मोठा व्यवसाय त्यांनी उभा केला आणि आता तो सुरू ठेवून त्यांनी खादाडी सुरू केलंय. या त्यांच्या व्यवसायात त्यांना पत्नी श्रेया यांचीही मोलाची साथ आहे. ‘खादाडी’मध्ये मिळणारे पदार्थ खाण्यासाठी आवर्जून येणाऱ्या मंडळींची संख्या मोठी आहे.

एकुणात निव्वळ खादाडीच्या आनंदासाठी हे एक छान ठिकाण आहे.. खादाडी..

कुठे आहे

  • ठिकाण – सदाशिव पेठेत, भरत नाटय़ मंदिरासमोर
  • वेळ – सकाळी साडेआठ ते रात्री दहा मंगळवारी बंद